"हिंगणा बसस्थानकावरील अतिक्रमण तातडीने हटवा," प्रताप सरनाईक यांचे निर्देश
हिंगणा येथील नवीन बस स्थानकाचे बांधकाम सुरू असून तेथे जुन्या जागा मालकाकडून बेकायदेशीर अतिक्रमण करण्याचा प्रकार घडला होता. याबाबत एसटी महामंडळाने पोलिसांच्याकडे तक्रार केली होती. तथापि पोलिसांनी त्याला दाद दिली नाही. साधी तक्रारही नोंदवली नाही. अधिवेशन काळामध्ये एसटीच्या अधिकाऱ्यांनी याबाबत परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्याकडे तक्रार केली असता , या जागेची प्रत्यक्ष पाहणी करून मंत्री सरनाईक यांनी संबंधित जिल्हा उपनिबंधक यांना तातडीने मोजणी करून ज्याचे अतिक्रमण झाले आहे.
ते हटवून मूळ मालकास म्हणजे एस टी महामंडळाला ती जागा परत करण्याचे निर्देश दिले. तथापि मोजणी दरम्यान सदर जागेवर मुळ मालकाचा हक्क असल्यास त्यानुसार ती जागा अधिकृतपणे त्याला हस्तांतरित करण्याचे देखील निर्देश एसटी महामंडळाला दिले. परंतु शासकीय जागा आहे, त्याला कुणी वाली नाही म्हणून त्यावर बेकायदेशीर रित्या कोणी अतिक्रमण करत असेल तर ते कदापि सहन केले जाणार नाही. असा सज्जड दम यावेळी त्यांनी दिला.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) नागपूर विभागाअंतर्गत येणाऱ्या हिंगणा बसस्थानकाच्या प्रस्तावित जागेवरून गंभीर वाद निर्माण झाला होता, हिंगणा येथील सर्व्हे क्रमांक २१० क, २१० अ व २२२ या एकूण १.७४ हेक्टर (सुमारे ४.३१ एकर) क्षेत्रावर नवीन बसस्थानक उभारण्याचे काम सुरू आहे. या जमिनीचे मुळ मालक म्हणून फुलाबाई भगवान कोटुगळे, स्वाती सुचेत बोडे आणि पांडुरंग राधा तुकारे यांची नोंद आहे. संबंधित जमिनीपोटी कोट्यवधी रुपयांचा मोबदला एसटी महामंडळाने संबंधितांना देण्यात आला आहे. त्यांच्याकडून सदर जमीन विकत घेऊन ती बस स्थानकाच्या बांधकामासाठी विकसित करण्यात येत आहे.
मात्र, त्यापैकी एका मुळ जमीन मालकाच्या वारसाने एसटीच्या अधिकृत जमिनीवर बेकायदेशीर रित्या कुंपण उभारणीचा प्रयत्न झाल्यानंतर प्रकरण अधिकच चिघळले. भूमी अभिलेख कार्यालयामार्फत पुनर्मोजणीसाठी तारखा निश्चित करण्यात आल्या असून, पुढील निर्णय मोजणी अहवाल आल्यानंतर घेण्यात येणार आहे.






