फोटो सौजन्य सोशल मीडिया
▶ नागपूर, क्राईम रिपोर्टर : एकाच फ्लॅटचा दोन वेगवेगळ्या व्यक्तींशी विक्री करार करून सुमारे १ कोटी २५ लाखाची फसवणूक केल्याचा प्रकार बजाजनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी निवृत्त सहायक कार्यकारी अभियंता प्रवीण उपलंचीवार (७०, रा. आरपीटीएस रोड, अजनी) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी बिल्डर संतोषकुमार गंदेवार (४५, रा. श्रीनगर एम्प्रेस मिल हाऊसिंग सोसायटी) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
FIFA : फिफा चषकात गुंजले अमनचे संगीत , नागपूरच्या सुपुत्राची दमदार छाप
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण उपलंचीवार हे सीडकोमधून सहायक कार्यकारी अभियंता पदावरून निवृत्त झाले आहे. मुलगा अमेरिकेत तर विवाहित मुलगी नागपुरात राहत असल्याने वृद्धापकाळात मुलीच्या घराजवळ राहण्यासाठी ते फ्लॅटच्या शोधात होते. दरम्यान, संतोषकुमार गंदेवार यांच्या जी. बी. रियल्टर्स या संस्थेने लक्ष्मीनगर परिसरात निवासी प्रकल्प उभारला होता. उपलंचीवार यांनी प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर सहाव्या मजल्यावरील ६०२ क्रमांकाचा फ्लॅट पसंत केला. दोघांमध्ये १ कोटीचा व्यवहार निश्चित झाला. त्यानंतर त्यांनी १ लाख ५१ हजार रुपये अनामत रक्कम भरून फ्लॅट आरक्षित केला. पुढील कालावधीत टप्प्याटप्प्याने ९४ लाख ५१ हजार रुपये अदा केले आणि विक्री करारही केला, करारानुसार तीन वर्षांत फ्लॅटचा ताबा देणे अपेक्षित होते.
StudentSafety: शाळेची बस आता पालकांच्या मोबाईलवर , राज्य सरकारचा निर्णय !
त्याच फ्लॅटचा दुसऱ्याशीही करार
तपासात बिल्डरने याच ६०२ क्रमांकाच्या फ्लॅटचा कविता वर्मा यांच्याशीही स्वतंत्र विक्री करार करून त्यांच्याकडून ३१ लाख रुपये स्वीकारल्याचे समोर आले. याच फ्लॅटची विक्री दर्शविणारी जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर उपलचीवार यांना फसवणुकीची बाब लक्षात आली. याबाबत त्यांनी बिल्डरकडे वारंवार विचारणा केली. मात्र, फ्लॅटचा ताबा किंवा भरलेली रक्कम परत न मिळाल्याने त्यांनी बजाजनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली, वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेनसिंग चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार संतोषकुमार गंदेवार याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला.






