रेशनच्या तांदळाचा गोरखधंदा; शासकीय योजनेच्या लाभावर धनदांडग्यांचा डोळा
सार्वजनिक वितरण प्रणाली (पीडीएस) म्हणजे गरिबांच्या ताटातील सवलतीचं अन्नधान्य. परंतु वर्षानुवर्षे याच योजनेचा काही धूर्त राईस मिलधारक, व्यापारी, व वखार महामंडळातील काही भ्रष्ट कर्मचारी संगनमताने गैरफायदा घेत असल्याचा गंभीर प्रकार आता पुन्हा उघडकीस येत आहे.
शासन हमीभावाने शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात धान खरेदी करते. या धान्याची भरडाई करून मिल धारकांनी तांदूळ सरकारी वखारीमध्ये जमा करायचा असतो. पण वास्तविक चित्र वेगळं आहे. अनेक राईस मिलधारक धान्य भरडायच्या फंदात न पडता थेट बाहेरून निकृष्ट दर्जाचा तांदूळ मागवतात किंवा बाजारात गरिबांकडून विकत घेतात. लाभार्थी उत्कृष्टतेच्या अभावामुळे मिळालेलं तांदूळ गहू स्वस्त धान्य दुकानात विकतात, आणि तोच तांदूळ काही दलाल राईस मिलधारकांमार्फत वखार महामंडळाकडे पुन्हा जमा होतो.
Accident News : मोशी-चाकण मार्गावर भीषण अपघात; भरधाव कारने 2 जणांना उडवले
यात सरकारी निरीक्षक, फूड इन्स्पेक्टर, काही वेळा वरिष्ठ अधिकारी यांची संमती आणि सहभाग असल्याच्या तक्रारी आहेत. लाखामागे वीस हजार, यामागे मोठ्या प्रमाणावर पैशांची देवाणघेवाण होत असल्याची लोकांची शंका आहे. स्वस्त धान्य दुकानातून विक्री केलेला तांदूळ पुन्हा तोच तांदूळ गरिबांच्या वाट्याला येत असतो. स्वस्त धान्य दुकान ते लाभार्थी पुन्हा दुकानात विक्री ते व्यापारी ते वखार महामंडळाचे गोदाम पुन्हा स्वस्त धान्य दुकान हेच चक्र नित्य फिरत आहे.
या प्रक्रियेमुळे एकाच निकृष्ट तांदळाचा साठा वर्षानुवर्षे गरिबांच्या ताटात फिरतो आहे. गरीब लाभार्थी नाईलाजाने तोच निकृष्ट तांदूळ उचलतात – कारण त्यांच्या तक्रारी ऐकून घेणं तर दूरच, पण त्यांना न्याय मिळण्याची अपेक्षाही नाही. त्यामुळे बहुतांश लोक तांदूळ घेतात आणि नंतर दुसरीकडे विकतात, काही जण तेच तांदूळ परत त्या दुकानातच विकतात.
गोरगरीब जनतेच्या हक्काच्या धान्यावर चालणाऱ्या या काळाबाजाराचा सखोल तपास करावा, दोषींवर कठोर कारवाई करावी. व गुणवत्तेच्या निकषांची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे.
हे प्रकरण केवळ एका तालुक्यात नाही, तर जिल्हाभर, अगदी राज्यभर सुरू आहे. वखार महामंडळ, सार्वजनिक वितरण कार्यालय, आणि फेडरेशन यांच्यात समन्वयाऐवजी ‘संघटना’ दिसते. शासन दरबारी यावर चौकशी होत नाही, आणि झाली तरी ती कागदावरच राहते.