संग्रहित फोटो
पिंपरी : राज्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून अपघाताच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मोशी-चाकण मार्गावर भरधाव कारने दोन पादचारी तरुणांना धडक दिली आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी (१४ जून) सायंकाळी कुरुळी येथे घडली आहे.
अमोल उत्तम उतेकर (वय२६, सातारा) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. शुभम संतोष गोळे (वय२२, रायगड) हा जखमी झाला आहे. शुभमने याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कार चालक संदीप किसन मोरे (वय४४, जुन्नर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संदीप हा त्याच्या ताब्यातील कार (एमएच ५०/यु ३४१२) ने मोशी ते चाकण दरम्यान भरधाव वेगात जात होता. कुरुळी येथे अमोल उतेकर आणि शुभम गोळे हे रस्त्याने पायी जात होते. संदीप याने त्याच्या ताब्यातील कारने दोघांना पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात अमोलच्या हात, पाय आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. तर शुभम हा गंभीर जखमी झाला आहे.
हे सुद्धा वाचा : सराईत गुंडाच्या एन्काऊंटरप्रकरणी मोठी अपडेट; पत्नीने पलिसांना धक्काबुक्की केली अन्…
भरधाव दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
भरधाव दुचाकीने धडक देऊन झालेल्या अपघातात एका पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. धायरीवरून धनगरवस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा अपघात घडला आहे. याप्रकरणी अज्ञात चालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. लालबिहारी मनराज मौर्य (वय ५५, रा. धनगरवस्ती, धायरी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी नांदेडसिटी पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत लालबिहारी यांच्या २३ वर्षीय मुलीने तक्रार दिली आहे.