देवेंद्र फडणवीस यांची नांदेडमध्ये सभा (फोटो- यूट्यूब)
नांदेड: आज महायुतीचे उमेदवार डॉ. तुषार राठोड यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर प्रचारसभा घेतली. राज्यात विधानसभा निवडणूक अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. राज्यात २८८ जागांसाठी २० तारखेला मतदान होणार आहे. तर २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. महायुतीचे नेते आपल्या उमेदवारांसाठी राज्यभर प्रचारसभा घेत आहेत. दरम्यान आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका करत असतानाच अनेक मुद्यांवर भाष्य केले आहे.
नांदेडमधील डॉ. तुषार राठोड यांच्या प्रचारार्थ बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्र विधानसभेत विधानसभा गाजवणारा आमदार म्हणून डॉ. तुषार राठोड यांच्याकडे पाहिले जाते. तसेच त्यांच्या मतदारसंघात देखील अतिशय जोरदार काम त्याचे सुरू असते. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस महाविकास आघाडीने एक खोटा नरेटीव्ह पसरवून आपली जागा थोड्या मतांनी जिंकली. मात्र आता त्यांचा खोटा नरेटीव्ह उघडा पडला आहे.
“त्यांनी सांगितले संविधान जाणार, आरक्षण जाणार. मात्र संविधानाचे रक्षण करणारे कोणी असेल तर ते नरेंद्र मोदी आहे हे जनतेच्या लक्षात आले. जम्मू-काश्मीर मध्ये संविधान गेले ७० वर्षे लागू होऊ शकले नव्हते. पण नरेंद्र मोदी यांनी भारताचे संविधान जम्मू-काश्मीरमध्ये लागू केले. पहिल्यांदा तेथील मुख्यमंत्र्याला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान हातात घेऊन शपथ घेऊन लागली याचा आनंद आहे. त्याचवेळी राहुल गांधी यांचा खरा चेहरा देखील समोर आला”, असे फडणवीस म्हणाले.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राहुल गांधी अमेरिकेत गेले. तिथे मुलाखत दिली. त्यावेळी एससी, एसटी, ओबीसी आरक्षणाची गरज संपली आहे, आम्ही ते रद्द करणार आहोत. एकीकडे संविधान दाखवायचे आणि तिकडे जाऊन आरक्षण रद्द करतो म्हणून बोलायचे. त्यामुळे कॉँग्रेसचा दुट्टपी चेहरा जनतेसमोर आला आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये यांचा फेक नरेटीव्ह चालणार नाही.”
“आपल्या सरकारने सातत्याने शेतकऱ्यांसाठी काम केले. शेतकऱ्यांना पीक विमा दिला. एक रुपयांत पीक विमा अशी घोषणा केली. किसान सन्मान योजनेच्या मार्फत केंद्र सरकारने शेतकऱ्यांना ६ हजार दिले. तसे आपणही ६ हजार दिले. पुन्हा आपले सरकार आल्यानंतर आपण १२ हजार नव्हे तर १५ हजार रुपये किसान सन्मान निधीच्या मार्फत शेतकऱ्यांना देणार आहोत, ” असे फडणवीस म्हणाले.
हेही वाचा: “आता केवळ ४० मिनिटांमध्ये नरीमन पॉइंट ते…”; देवेंद्र फडणवीसांची अत्यंत महत्वाची घोषणा
नरीमन पॉइंट ते विरार हा रस्ते प्रवास केवळ ४० मिनिटांध्ये होणार आहे. कोस्टल रोडचा विस्तार भाईंदर, विरार आणि पालघरपर्यंत केला जाणार आहे. त्यासाठी जपान सरकार ४० हजार कोटींचे कर्ज देणार आहे. या ठिकाणी कोस्टल रोडचे काम सुरू होत आहे. त्यासाठी ४० हजार कोटींचे कर्ज मिळणार आहे. तसेच वाढवण बंदरात बंदर होत आहे. त्यामुळे या भागांचा मोठा विकास होणार आहे.