'पीएम नवीन योजना'च्या नावाखाली APK फाईल पाठवली अन् ती उघडताच आर्थिक लूट झाली (फोटो सौजन्य-X)
इंदापूर : इंदापूर शहरात सायबर फसवणुकीच्या प्रकारांनी धोकादायक वळण घेतले असून, विविध आमिषांद्वारे नागरिकांची आर्थिक लूट सुरू आहे. दाम दुप्पट करून देण्याचे आश्वासन, शेअर मार्केटमध्ये पैसे वाढवून देण्याचा दावा अशा जुन्या पद्धतींबरोबरच आता ‘पीएम नवीन योजना’च्या नावाखाली APK फाईल पाठवून मोबाईल हॅक करण्याचे प्रकार वाढले आहेत.
व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्रामवर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचे सांगत बनावट चलन पाठवले जाते. संबंधित एपीके फाईल डाऊनलोड करताच मोबाईलवरील संपूर्ण ताबा हॅकर्सकडे जातो. मोबाईलमधील डेटा, फोटो, बँकिंग माहिती चोरीला जात असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. याचबरोबर हॅक केलेल्या मोबाईलमधील कॉन्टॅक्ट लिस्टमधील व्यक्तींना “माझ्या यूपीआय सर्व्हरमध्ये समस्या आहे, मला तातडीने काही रुपयांची मदत हवी आहे, काही तासांत परत करतो” अशा आशयाचे मेसेज पाठवले जात आहेत. संबंधित व्यक्ती अडचणीत असल्याचा समज करून अनेकांकडून पैसे उकळले जात असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, अलीकडेच इंदापूरमधील काही प्रतिष्ठित नागरिकांनाही या सायबर जाळ्याचा फटका बसल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे अनोळखी लिंक किंवा एपीके फाईल डाऊनलोड न करता, कोणतीही आर्थिक मदत करण्यापूर्वी थेट फोनवर खात्री करूनच व्यवहार करावेत, असे आवाहन करण्यात येत आहे.
पुण्यात ज्येष्ठ वकिलाची फसवणूक
पुण्यातील एका ६८ वर्षीय ज्येष्ठ असलेल्या वकिलांना सायबर चोरट्यांनी शेअर ट्रेडिंगमधील जादा परतावा मिळवून देण्याच्या आमिषाने तब्बल १४ कोटी २५ लाख ६५ हजार ९६५ रुपयांना गंडा घातला आहे. पुणे शहरात सातत्याने या घटना घडत असल्याचेही दिसत आहे. विशेष म्हणजे ही फसवणूक ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीत घडली आहे. याप्रकरणी ६८ वर्षीय नागरिकाने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, मोबाईल धारक व विविध बँक खातेधारक यांच्याविरूद्ध गुन्हा नोंद केला आहे.
हेदेखील वाचा : Godavari Chit Fund Fraud: गोदावरी चिटफंडने डॉक्टर महिलेला लावला लाखोंचा चुना; बनावट कागदपत्रांच्या आधारे केली मोठी फसवणूक






