"...अन्यथा जनआंदोलनास तयार रहा," खासदार नरेश म्हस्के यांचा मध्य रेल्वेला इशारा
ठाणे लोकसभा मतदारसंघातील सर्व रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी मुलभूत सोयीसुविधा देण्यात मध्य रेल्वे प्रशासनाकडून दिरंगाई होत आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक धर्मवीर मीना यांची आज भेट घेऊन बैठक घेत चांगलाच दम देत लवकरात लवकर विकासकामे पूर्ण न केल्यास जनआंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
आरएलडीएच्या माध्यमातून ठाणे रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास लवकरात लवकर होणे अपेक्षित आहे. ठाणे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी डीपीआर मास्टर प्लॅनच्या माध्यमातून ९५० कोटी रुपयांचा प्रस्ताव २६ मे २०२३ रोजी रेल्वे प्राधिकरणाने पाठविला आहे. मी निवडून आल्यापासून या विकासकामासाठी नियमित पाठपुरावा करत आहे. मात्र, अद्याप पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू झालेली नाही. मास्टर प्लॅन पाठवून सुद्धा दोन वर्षांहून अधिक काळ लोटला तरी काम सुरु न झाल्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली. या बैठकीला डीजीएम के. के. मिश्रा, डीआरएम हरीश मीना, एस. एस. गुप्ता आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
ठाणे ते मुंबई (सीएसएमटी) कडे जाणाऱ्या फलाटावर अजून एक पादचारी पूल बांधणे आवश्यक आहे.
नवी मुंबईतील स्टेशनांची उभारणी सिडकोने केली असली तरी सेवा मध्य रेल्वे देते. परंतु दोन्ही संस्थांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने स्थानकांची परिस्थिती दयनीय आहे. प्रवाशांच्या सततच्या तक्रारींवर कारवाई न झाल्यास कायदा हातात घेऊन आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही खासदार म्हस्के यांनी दिला. यानंतर महाप्रबंधक मीना व सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून संयुक्त बैठक घेण्याचे ठरले.
दिघा रेल्वे स्थानक ते वाशी रेल्वे स्थानक दरम्यानच्या (दिघा, ऐरोली, सानपाडा) स्थानकांतील सोयी सुविधा आणि सुधारणांसाठीही खासदार नरेश म्हस्के यांनी सूचना केल्या.
मध्य रेल्वे, मुंबई विभागाने दिघा ते ठाणे स्थानका दरम्यानच्या ट्रकच्या अप-डाऊन लाईनवरील वर आणि खाली जाणाऱ्या जुळ्या (फक्त दुचाकी/तीन चाकी वाहनांसाठी) भुयारी मार्गांसाठी प्रस्ताव पाठवला आहे. हे भुयारी मार्ग लवकरात लवकर होणे आवश्यक असून भुयारी मार्ग नसल्यामुळे नागरिकांना ट्रॅक ओलांडावा लागत असून अपघात होत असल्याची गंभीर बाब खासदार नरेश म्हस्के यांनी महाव्यवस्थापकांच्या निदर्शनास आणून दिली.
दिघा रेल्वे स्थानकात छत, पंखे, दिवे आणि ध्वनिक्षेपकाची दुरुस्ती, रेल्वे स्टेशन बाहेर ब्लॉक बसविणे, तसेच दिघा, ऐरोली आणि कोपरखैरणे या स्थानकांवर एस्कलेटरची सुविधा, ऐरोली स्थानकावर आरक्षण खिडकी सुरू करणे, रबाळे पश्चिम कडील तिकीट खिडकी रात्री 11 वाजेपर्यंत सुरु ठेवणे, सानपाडा-जुईनगर रेल्वे पुलाचे काम पुन्हा सुरू करण्याची सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केली.
वाशी ते बेलापूर, तुर्भे ते ऐरोली आणि बामनडोंगरी ते खारकोपर या सर्व रेल्वे स्थानकांवरील रेल्वे फलाट, रेल्वे कार्यालयांच्या आजूबाजूचा परिसराची सुधारणा करणे आवश्यक असल्याची बाब खासदार नरेश म्हस्के यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.