वाईमध्ये अँटी नारकोटिक्स टास्क फोर्सच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येणाऱ्या “नशामुक्त भारत अभियान” आयोजित करण्यात आले (फोटो - टीम नवराष्ट्र)
वाई : पांचगणी या शैक्षणिक केंद्रावर असणाऱ्या शाळांनी आपल्या शाळेतील मुले अमली पदार्थाच्या आहारी जाऊ नयेत याची काळजी घ्यावी तसेच व्यावसायिकांनी सुद्धा असे पदार्थ विक्री न करण्याची खबरदारी घ्यावी. तरच आपल्याकडे देशभरातून शिकण्यासाठी येणारी भावी पिढी निर्व्यसनी घडविण्याची आपली जबाबदारी आपण सर्वांनी चोख बजावू, असे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी सांगत पाचगणी पोलिसांनी आज नशामुक्तीचा नारा देत ‘नशामुक्त पाचगणी’ अभियानाची सुरुवात केली.
सातारा जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य पोलीसांच्या अँटी नारकोटिक्स टास्क फोर्सच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येणाऱ्या “नशामुक्त भारत अभियान” राबवण्यात आले. या संदर्भात आज पाचगणी पोलीस ठाण्यात शहरातील सर्व शाळा प्रशासनाचे प्रतिनिधी, बाजारपेठेतील सर्व व्यावसायिक यांची बैठक पोलिस ठाण्याच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अमली पदार्थांपासून शालेय मुलांना दूर ठेवावे असा नारा देण्यात आला. यावेळी पाचगणी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार, पोलिस उपनिरीक्षक बालाजी सोनुने, पोलिस हवालदार सतीश पवार, अमोल जगताप, रवींद्र कदम, इम्रान मुलांनी तसेच शाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना अमली पदार्थविरोधी जनजागृतीसंदर्भात मार्गदर्शन करताना पवार म्हणाले की, “अमली पदार्थांच्या विळख्यातून युवकांना दूर ठेवण्याच्या या मोहिमेत पांचगणी करांचा सहभाग महत्वाचा ठरणार असून शाळा व्यवस्थापनांनी शाळा परिसरात सीसीटीव्ही लावावे. त्याचा बॅकअप दोन महिन्यांचातरी असावा. सर्व कर्मचारी यांची चारित्र्य पडताळणी करावी. शाळेत तक्रार किंवा सूचना पेटी लावावी. शाळांच्या बाहेर फिरणारे टवाळखोर मुले, रोडरोमियो यांचा वावर आढळल्यास पोलिसांना कळवावे. शाळा सुटण्याच्या आणि भरण्याच्या वेळी होणारी वाहतूक कोंडी शाळा परिसरात होई नये याचीही जबाबदारी घ्यावी, असा सूचना पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिल्या आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
तसेच पान टपरी,बिअर शॉपी धारकांनी लहान व शालेय मुलांना कसल्याही अमली पदार्थ अथवा पेयांची विक्री करू नये. पहिल्यांदा अशा अवैध विक्रीचे पदार्थ विकूच नयेत. आणि ज्यांना विक्रीची परवानगी आहे. ते पदार्थ १८ वर्षाखालील शालेय मुलांना विकू नयेत याची काळजी घ्यावी अन्यथा कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवा अशीही ताकीद यावेळी सपोनी पवार यांनी दिली. या बैठकीला पांचगणीतील सुमारे ३५ शाळांचे प्रतिनिधी तसेच शहरातील व्यावसायिक उपस्थित होते.
अन्यथा व्यवसाय परवाना रद्द…
पुढे ते म्हणाले की, अठरा वर्षाखालील कुठलाही विद्यार्थी पान टपरीवर आढळल्यास तसेच त्या विद्यार्थ्यांशी नशिल्या पदार्थांचा कसलाही व्यवहार व्यावसायिकांनी केल्यास त्याचेवर कारवाई होईलच पण त्याची पान टपरी बंद करण्याची प्रक्रिया सुद्धा केली जाईल असा थेट इशारा दिलीप पवार यांनी शहरातील व्यावसायिकांना दिला आहे. यानिमित्ताने अमली पदार्थ विरोधी जनजागृतीसाठी पाचगणी पोलिसांच्या वतीने अमली पदार्थ विरोधावर शालेय मुलांची निबंध स्पर्धा तसेच शहरातून जनजागृती करण्यात येणार आहे.