४५ हजार नावे रेशन कार्डवरून वगळली
नाशिक : रेशन कार्ड व्यवस्थेत मोठा बदल करण्यात येत आहे. आयकर भरणारे जास्त उत्पन्न असलेले तसेच विविध कंपन्यांमध्ये संचालक म्हणून कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना रेशनवरील धान्याचा लाभ न देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील ४५ हजार ९४८ आयकर दात्यांचे नावे रेशन कार्डावरून वगळण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा शाखेने दिली आहे.
रेशन कार्डमधील अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यासाठी राज्यभरात ‘मिशन सुधार’ मोहीम राबविली जात आहे. या मोहीमेंतर्गत केंद्र सरकारने निश्चित केलेल्या निकषानुसार अपात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली असून, ही यादी जिल्हा प्रशासनाकडे पाठवण्यात आली आहे. दरम्यान, जिल्ह्यात ५ लाख ६९ हजार ६६९ आयकरदाते आहे. आतापर्यंत यापैकी ४५ हजार ९४८ आयकरदात्यांचे नावे रेशनकार्डवरून रद्द करण्यात आली आहे. ५५४४९ आयकरदात्यांची नावे केशरी रेशन कार्डमधून वगळून अंत्योदय रेशन कार्डमध्ये वर्ग करण्यात आली आहे.
तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रत्येक प्रकरणाची चौकशी केली जात आहे. दरम्यान, ही कारवाई पुरवठा विभागाच्या दृष्टीने आतापर्यंतची सर्वात मोठी मोहीम मानली जात असून, यामुळे रेशन कार्डमधील गैरव्यवहार रोखून खऱ्या गरजूंना लाभ देण्याचा प्रयत्न होणार आहे.
गरजूंना लाभ देण्याचा प्रयत्न
केंद्र सरकारने अशा अपात्र लाभार्थ्यांची यादी राज्य सरकारला पाठवली असून, तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांद्वारे तपासणी सुरू आहे. गरीब व गरजू कुटुंबांना धान्याचा लाभ मिळावा, यासाठी या मोहिमेअंतर्गत अपात्र लोकांना रेशन सिस्टीममधून बाहेर काढले जात आहे.
5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार
दुसरीकडे, सरकारने आयुष्मान भारत योजना सुलभ करून सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. आता लोकांना आयुष्मान कार्ड मिळवण्यासाठी दूरच्या केंद्रांवर किंवा रुग्णालयांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही. नवीन प्रणालीअंतर्गत, आयुष्मान कार्ड बनवण्याची सुविधा आता शिधावाटप दुकानांमध्ये राबविण्यात येत आहे. आणि तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवरुनही हे कार्ड जनरेट करु शकता.






