( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
ग्रामीण भागात पतीच्या निधनानंतर महिलांना आजही अनेक सामाजिक बंधने, अंधश्रद्धा आणि उपेक्षेच्या ओझ्याखाली जगावे लागते. या ‘एकल’ महिलांचे आयुष्य एकाकीपणाच्या कोंदणात अडकलेले असते. या महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्या आयुष्यात आशेचा किरण पेरण्यासाठी नाशिक जिल्हा परिषदेने कंबर कसली आहे. जिल्हा परिषदेच्या ‘एकल महिला’ मोहिमेद्वारे गावागावात अशा महिलांची माहिती गोळा करण्यात आली. यापूर्वी त्यांच्यासाठी पुनर्विवाहासारखे धाडसी सोहळे यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर, आता रंगपंचमीच्या निमित्ताने त्यांना आनंदाच्या रंगांत न्हाऊ घालण्याचा हा अनोखा प्रयोग करण्यात आला.
हा कार्यक्रम मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या पुढाकाराने आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, यात कोणतीही कृत्रिम रंगबाजी नव्हती, तर पूर्णपणे नैसर्गिक रंगांचा वापर करण्यात आला होता. हिरवा, निळा, पिवळा, लाल आणि गुलाबी रंगांची उधळण करत असताना या महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. विशेष म्हणजे, केवळ महिला अधिकारीच नव्हे, तर पुरुष अधिकाऱ्यांनीही आपला बडेजावपणा आणि पदाचा रुबाब बाजूला ठेवून या सोहळ्यात मुक्तपणे सहभाग नोंदवला.
तब्बल तीन तास चाललेल्या या रंगोत्सवात महिलांनी आपल्या मनातील दुःख, समाजाची भीती आणि जुन्या प्रथांचे जोखड पूर्णपणे झुगारून दिले होते. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ, शिक्षणाधिकारी सरोज जगताप आणि गट विकास अधिकारी सोनिया नाकाडे यांसारख्या वरिष्ठ महिला अधिकारीही उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. या उपक्रमामुळे ‘जीवनात रंगाला वर्ज्य मानणाऱ्या’ महिलांना आपणही आनंदाने जगू शकतो, हा नवा आत्मविश्वास मिळाला आहे. नाशिक जिल्हा परिषदेचा हा प्रयोग खऱ्या अर्थाने समाजासाठी एक दिशादर्शक ठरला असून, विधवा महिलांना सन्मानाने आणि उत्साहाने जगण्याची नवी उमेद देणारा ठरला आहे.






