नालायक शब्द तुम्हाला का झोंबला? सुरज पाटील यांची नरेश म्हस्केंवर टीका
नवी मुंबईच्या हिताच्या विरोधात काम करणाऱ्यांना ‘नालायक’ म्हटलं, तर त्यात चूक काय?” असा थेट सवाल माजी नगरसेवक सुरज पाटील यांनी उपस्थित केला आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर केलेल्या टीकेला त्यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. “गेल्या ४० वर्षांत गणेश नाईक यांनी नवी मुंबईला जेवढं उंच स्थान दिलं, ते कोणाच्याही नेतृत्वाखाली शक्य झालं नाही,” असे पाटील यांनी म्हटले.
खासदार म्हस्के यांनी अलीकडे घेतलेल्या पत्रकार परिषदेत नवी मुंबईच्या नेतृत्वावर केलेल्या आरोपांवर टीका करत पाटील म्हणाले, “ज्यांनी शहराची लूट केली, त्यांना चोर म्हणणं चुकीचं आहे का? कोरोना काळात नवी मुंबईचा ऑक्सिजन, इंजेक्शन्स आणि पाणी सुद्धा पळवलं गेलं. कराराप्रमाणे नवी मुंबईला एमआयडीसीच्या बारावी धरणातून 80 एमएलडी पाणी मिळायला हवं होतं, पण प्रत्यक्षात फक्त 40 एमएलडीच मिळत आहे.”
धोकादायक Cough Syrup वर बंदी! ‘या’ सिरपचा वापर तात्काळ थांबवण्याचे शासनाचे आवाहन
ते पुढे म्हणाले की, “बारावी धरणग्रस्तांना एका दिवसात महापालिकेत कायमस्वरूपी नोकऱ्या देण्यात आल्या, पण नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची मुलं आजही ठोक किंवा कंत्राटी पद्धतीवर काम करत आहेत. त्यांना न्याय कधी मिळणार?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
पाटील यांनी १४ गावांच्या नवी मुंबई महापालिकेत समावेशाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. “ही गावे नवी मुंबईवर जबरदस्तीने लादली गेली तर येथील पायाभूत व्यवस्था कोलमडून पडेल,” असे ते म्हणाले. या गावांचा भौगोलिक आणि सामाजिक संबंध ठाणे किंवा कल्याण-डोंबिवलीशी आहे, मग या शहरांमध्येच समावेश का केला जात नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
२०१४ मध्ये पालिकेने या गावांच्या समावेशासाठी सशर्त ठराव केला होता. त्या वेळी भुयारी मार्ग बांधणीसाठी ५०० कोटी रुपयांचा निधी मागवला गेला होता. मात्र, अनेक वर्षे लोटल्यानंतर आता या गावांना आवश्यक नागरी सुविधा देण्यासाठी किमान ६६०० कोटी रुपयांची आवश्यकता भासेल, असे तत्कालीन आयुक्त अभिजीत बांगर यांनी नगरविकास विभागाला पत्राद्वारे स्पष्ट केले होते.
सुरज पाटील म्हणाले, “नवी मुंबई ही सर्वात स्वच्छ, राहण्यायोग्य आणि पाणीपुरवठ्यात स्वयंपूर्ण शहर आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येची १४ गावे जबरदस्तीने जोडली गेली, तर शहराचा दर्जा आणि मानांकन घसरेल. आमच्या नेतृत्वाने जी भूमिका मांडली, ती शहराच्या भविष्यासाठी योग्य आहे.”
ते पुढे म्हणाले, “नवी मुंबईच्या विकासाचा हेवा करणाऱ्यांनीच नागरी सुविधांसाठी राखीव भूखंड विकले, सीसी मिळवून दिले आणि शहराला मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवलं. त्यामुळे आज शहराची वाट लावणाऱ्यांनीच विकासावर टीका करणं हे दुटप्पीपणाचं उदाहरण आहे.”
शेवटी सुरज पाटील म्हणाले, “खासदार म्हस्के यांनी निवडणुकीपूर्वी गणेश नाईक यांच्या कार्याचं कौतुक केलं आणि आता त्यांच्यावर टीका करत आहेत. त्यामुळे दूतोंडी कोण आहे हे स्पष्ट झालं आहे. नवी मुंबईचा विकास आणि लगतच्या शहरांच्या प्रगतीची तुलना करायची असेल, तर आम्ही खुल्या चर्चेसाठी तयार आहोत.”