'या' सिरपचा वापर तात्काळ थांबवण्याचे शासनाचे आवाहन
मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये या कफ सिरपच्या वापरामुळे काही बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब नुकतीच समोर आली आहे. याच पाश्वभूमीवर राज्य सरकारच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने रविवारी एक तात्काळ सूचना जारी करत नागरिकांना “कोल्ड्रिफ कफ सिरप बॅच नंबर एसआर-१३ (Coldrif Syrup, Batch No. SR-13) या औषधाचा वापर त्वरित थांबवण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, तपासानंतर या औषधामध्ये डायइथिलीन ग्लायकोल-डीईजी (Diethylene Glycol – DEG) हा अत्यंत विषारी घटक आढळून आल्याचे देखील स्पष्ट झाले आहे.
सदर सिरपची निर्मिती स्रेशन फार्मा (Sresan Pharma), कांचीपुरम जिल्हा, तामिळनाडू येथील कंपनीकडून करण्यात आली आहे. या सिरपचा बॅच क्रमांक एसआर-13 असून, निर्मिती तारीख मे 2025 आणि कालबाह्यता तारीख एप्रिल 2027 अशी आहे. अन्न व औषध प्रशासनाने राज्यातील सर्व औषध विक्रेते, वितरक आणि रुग्णालयांना या औषधाची विक्री तात्काळ थांबवण्याचे आणि संबंधित बॅचचा साठा गोठवण्याचे आदेश दिले आहेत.
जनतेला आवाहन करण्यात आले आहे की, त्यांच्या घरी किंवा दुकानात हे औषध उपलब्ध असल्यास ते वापरू नये आणि तात्काळ जिल्हा अन्न व औषध प्रशासन कार्यालयाशी संपर्क साधावा. या संदर्भात माहिती देण्यासाठी प्रशासनाने टोल-फ्री क्रमांक १८०० २२२ ३६५, ई-मेल jchq.fda-mah@nic.in आणि मोबाईल क्रमांक ९८९२८३२२८८ उपलब्ध करून दिले आहेत.
Bihar Election 2025: कधी होणार बिहार विधानसभा निवडणुका? निवडणूक आयुक्तांनी स्पष्टचं सांगितलं
राज्य अन्न व औषध प्रशासनाने सांगितले आहे की, या औषधाचा महाराष्ट्रात झालेला पुरवठा शोधण्यासाठी तामिळनाडू औषध नियंत्रक विभागाशी समन्वय साधला जात आहे. तसेच आवश्यक ती कारवाई सुरू देखील झाली आहे.
राज्य औषध नियंत्रक डॉ. आर. गहाणे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले की, “जनतेने अशा प्रकारच्या औषधांचा वापर टाळावा, कोणतीही संशयास्पद माहिती त्वरित प्रशासनाला कळवावी आणि आपल्या सुरक्षिततेसाठी दक्ष।असावे” अशा घटना पुन्हा एकदा औषधांच्या गुणवत्तेबाबत जनजागृती आणि सावधगिरीची गरज अधोरेखित करते.