नवी मुंबई-सिद्धेश प्रधान : नेरुळ येथील टीएस चाणक्य परिसरातील कांदळवनांची कत्तल करण्यात आली आहे. हा भाग अद्याप वन विभागाकडे सिडकोने हस्तांतरित केलेला नसल्याने अद्याप त्यावर सिडकोचे हक्क आहेत. तर दुसरीकडे कांदळवनानी बहरलेला भाग असल्याने या ठिकाणी मुबलक प्रमाणात जैवविविधता असून हे जलचर खाण्यासाठी फ्लेमिंगो येथे येत असतात. नवी मुंबईत एन आर आय लगतचा भाग तसेच टी एस चाणक्यच्या मागील बाजू फ्लेमिंगो पक्ष्यांचे आवडते ठिकाण असल्याने येथे या पक्ष्यांचा राबता असतो. हजारो मैलांवरून हे पक्षी या दोन पाणथळ जागांवर उतरतात. मात्र आता हे भाग देखील विकासकांच्या नजरेत भरल्याने ते उध्वस्त करण्याचे प्रयत्न विकासकांनी सुरू केले आहेत. त्यातूनच येथील कांदळवने नष्ट करण्यात आल्याने पर्यावरण प्रेमी संतप्त झाले आहेत. पर्यावरण प्रेमी सुनील अग्रवाल यांनी याचा निषेध म्हणून मानवी साखळी तयार करून निषेध नोंदवला. याचे पडसाद उमटले असून गुरुवारी तहसीलदारांनी या भागाची पाहणी केली आहे.
फ्लेमिंगो अधिवास तलाव वाचविण्यासाठी निसर्गप्रेमीनी पुढाकार घेतला असून यासदर्भात आंदोलन करण्यास सुरुवात केलेली आहे. दर रविवारी सकाळी आठ वाजता निदर्शन करण्यात येणार आहे. त्यानुसार निसर्गप्रेमीनी निषेध व्यक्त केला. यावेळी टीएस चालण्या तलवाचे संरक्षण व खारफुटीचा नाश करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली जात आहे. यावेळी खारघर येथील सरस्वती अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच मंग्रोव्ह सोलजर्स संस्थेच्या धर्मेश बराई यांच्या मार्गदर्शनाखाली निषेध साखळीत सहभागी झाले होते. यावेळी स्वयंसेवकांनी चाणक्य तलाव परिसरात कचरा स्वच्छता मोहीम राबवून एक ट्रक कचरा तलावाबाहेर देखील काढला.
नेरुळ येथील टी एस चाणक्य सागरी प्रशिक्षण संस्थेच्या मागे वसलेले सरोवर ज्याला चाणक्य तलाव संबोधित केले जाते. या चाणक्य तलावाच्या देखभाल व सुरक्षेकडे सिडकोने दुर्लक्ष केले आहे. ही जागा विकासकाला देऊन सिडकोने याआधीच ‘व्यवसायिक दृष्टिकोन ‘ दाखवला आहे. स्थानिक नियोजन प्राधिकरण म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेकडे देखभाल व्यवस्था सुपूर्दही केली नाही. तर या ठिकाणी एका बड्या बिल्डरच्या सुरक्षा कर्मचार्यांनी आता या भागात गस्त घालण्यास सुरुवात केली आहे, स्थानिकांना आणि मच्छिमारांनी चाणक्य तलाव हॉटेल आणि निवासी टॉवर्सच्या बांधकामासाठी विकण्यात आल्याची माहिती दिली जात आहे. तर डिसेंबर २०२३ च्या दुसऱ्या आठवड्यात, चाणक्य तलावा बाजूकडील १२० पेक्षा जास्त कांदळवने रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तींनी निर्दयीपणे तोडण्याचा प्रकार घडला आहे.
या मुळे नवी मुंबई परिसरातील निसर्गप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे. तर या संदर्भात कांदळवन कक्ष आणि कांदळवन संरक्षण व संवर्धन समितीकडे तक्रारी दाखल करण्यात आली असून हे प्रकरण एका संस्थेकडून दुसऱ्या संस्थेकडे सोपवत आहेत. नवी मुंबई पर्यावरण संवर्धन संस्था, मांग्रोव्ह सोलजर्स, पर्यावरण दक्षता मंडळ, येऊर एव्हायरंमेंटल सोसायटी, सरस्वती अभियांत्रिकी महाविद्यालय, राष्ट्र सेवा योजना या संस्था सहभागी झाल्या होत्या.
नवी मुंबई पालिका काय करणार?
तत्कालीन आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्वच्छ सर्वेक्षणातर्गत नवी मुंबई शहराला गुलाबी रंगात रंगवून फ्लेमिंगो सिटीचा दर्जा देऊन नवी ओळख दिली आहे. त्यानुसार ठिकठिकाणी फ्लेमिंगो स्टॅचू उभारून फ्लेमिंगो पक्ष्यांच्या संवर्धनासाठी पाऊल उचलले होते. ज्या दोन पाणथळ जागांच्या आधारावर नवी मुंबई पालिका फ्लेमिंगो शहर म्हणून देशभरात ओळख मिरवत आहे. त्या दोन्ही पाणथळ जागा सिडकोकडून उध्वस्त करण्याचा प्रयत्न चालवल्याचा आरोप सुनील अग्रवाल व बी एन कुमार या पर्यावरणवाद्यांनी सातत्याने केला आहे. या जागा टिकण्यासाठी टिकवण्यासाठी फ्लेमिंगो पक्षी वाचण्यासाठी पर्यावरण वादी लढत आहेत. मात्र फ्लेमिंगोवर स्वतःचे मार्केटिंग करणारी नवी मुंबई पालिका मात्र सिडकोच्या या कारभारा विरोधात ब्र कढेनासी झाली असल्याने पालिकेच्या या दुटप्पी कारभारा विरोधात पर्यावरणवादी संतप्त झाले आहेत.