मुंबई : कॉर्डिलिया क्रुझप्रकरणी समीर वानखेडे यांचे पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. आर्यन खानला अटक करण्यात आलेल्या कॉर्डिलिया क्रुझवर एका न्याय दंडाधिकाऱ्यांनाही एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते. मात्र, त्यांना या प्रकरणातून गुप्तपणे बाहेर काढल्याचा दावा करणारी याचिका सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे.
याचिकेनुसार, दंडाधिकारी क्रुझवर अमली पदार्थांच्या नशेत सापडले होते त्याच अवस्थेत त्यांना थेट रूग्णालयात नेण्यात आल्याचा दावाही करण्यात आआल्याचा दावाही तिरोडकर यांनी केला आहे. दुसरीकडे, अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी इरफान शेख हे त्यांच्या न्यायदालनात एनसीबीने पुरावा म्हणून जप्त केलेला अमली पदार्थांचा मुद्देमालवर थेट डल्ला मारून स्वत:ही सेवन केल्याचा आणि बॉलिवूडमधील काही मित्रांमध्येही वाटल्याचा गौप्यस्फोटही याचिकेतून केला आहे. गुरूवारी न्या.रेवती मोहिते डेरे आणि न्या. गोरी गोडसे यांच्या खंडपीठापुढे यावर प्राथमिक सुनावणी झाली. तपासयंत्रणेच्यावतीने वकील हितेन वेणेगावर यांनी या याचिकेच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले याचिकाकर्त्यांकडून पुरावे आणि माहिती स्त्रोत प्रतिज्ञापत्रावर देण्याची मागणी केली. याचिकाकर्त्यांनी थेट न्यायव्यवस्थेवर केलेल्या आऱोपांचा आधार काय? असा प्रश्न खंडपीठाने उपस्थित केला आणि याचिकेवर कोणतेही आदेश न देता सुनावणी तीन आठवड्यांसाठी तहकूब केली. तसेच सीबीआयला या प्रकरणात लक्ष घालण्याचे तोंडी आदेश दिले.
काय आहे प्रकरण
कॉर्डिलिया क्रुझ आणि आर्यन खानप्रकरणात एनसीबीच्या छापेमारीवर विशेषतः समीर वानखेडेंच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित झाले. सीबीआयने या प्रकरणी वानखेडेंवर थेट खंडणीचा गुन्हा दाखल करून अटकेची तयारी केली असताना याचिकेतील गंभीर आरोपामुळे या प्रकरणात आता एक नवे वळण मिळाले आहे. एनसीबीच्या या छापेमारीमध्ये बलार्ड पीअर कोर्टातील दंडाधिकारी इरफान शेख यांनाही ताब्यात घेतले होते. या दंडाधिकाऱ्यांसमोर एनसीबीची अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्याने एनसीबीने त्यांना गुप्तपणे बाहेर काढले. त्यावेळी दंडाधिकारी नशेत होते प्रथम त्यांना थेट सैफी रूग्णालयात नेऊन प्राथमिक उपचार केले. मात्र हे दडपवण्यासाठी केसपेपर न बनवण्याची विनंती सैफीमध्ये करण्यात आली. रूग्णालय प्रशासनाने नकार दिल्याने शेख यांना नायर रूग्णालयात हलवण्यात आले. नायरमध्ये उपचारांत शेख यांच्या लघवीचे नमुने पी.डी. हिंदुजा इथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यामुळे त्यावेळी शेख यांच्या उपचारांची तागदोपत्री नोंद करणं रूग्णालय प्रशासनाला भाग पडलं. ७ ऑक्टोबर २०२१ रोजी आलेले शेख यांच्या चाचणी पॉझिटिव्ह आले असून त्यांत त्यांनी कोकेनचे प्रमाणाबाहेर सेवन केल्याचे स्पष्ट झाले.