'लाडक्या बहिणींना २१०० रुपये देऊ असं कोणीही म्हटलेलं नाही'; मंत्री झिरवळांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेंतर्गत २१०० रुपये देण्याचं आश्वासन कोणीही दिलेलं नाही. तसंच लाडक्या बहिणी १५०० रुपयांमध्ये खूश आहेत, असं मत मंत्री नरहरी झिरवळ यांनी केलं आहे. त्यामुळे महायुती सरकारला पुन्हा एकदा विरोधकांच्या टीकेला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योजनेची रक्कम २१०० रुपयांपर्यंत वाढवण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याची पुर्तता अद्याप झालेली नाही, उलट काही नावं वगळण्यात येत आहेत.
मंत्री नरहरी झिरवळ काय म्हणाले?
“लाडक्या बहिणी नाराज आहेत, असं माध्यमं आणि विरोधक पक्षांकडून सांगितलं जात आहे. मात्र महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी खूश आहेत. लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणार असल्याचं कोणीही म्हटलेलं नाही, असं मंत्री नरहरी झिरवळ यांनी म्हटलं आहे.
“विरोधकांनी आधी म्हटलं होतं की महायुती सरकार लाडक्या बहिणींना १५०० रुपये देणार नाही. कारण सरकारकडे १५०० रुपये देण्याचीही ऐपत नसल्याची टीका केली होती. त्यानंतर त्यांनी, १५०० रुपये दिले नाहीत तर २१०० कसे देणार? असं म्हटलं होतं. राज्य सरकारने लाडक्या बहिणींना १५०० रुपये दिले तर आता २१०० रुपये देण्यावर विरोधक जोर देत आहेत. मात्र, असा काही प्रकार झालेला नाही. लाडक्या बहिणींना १५०० रुपये देखील खूप असून त्या त्यामध्ये खूश आहेत, असं झिरवळ यांनी म्हटलं आहे.
विधानसभा निवडणूक महायुती सरकारने एकत्र लढवली. त्याआधी सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात लागू केली. त्याचा प्रभाव निवडणुकीवर राहिला आणि महायुतीला निवडणुकीत मोठं यश मिळालं. निवडणुकीआधी या योजनेंतर्गत १५०० रुपये देण्याची घोषणा सरकारने केली होती. मात्र निवडणुकीत ही रक्कम २१०० देण्याचं आस्वासन देण्यात आलं होतं. मात्र सरकारने त्यावर कोणतीही अंमलबजावणी केली नाही.