मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) विविध घडामोडी घडत आहे. त्यात अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी (NCP) करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यात आज अजित पवारांसह त्यांच्या गटाच्या मंत्र्यांनी वाय. बी. सेंटर येथे शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली.
या भेटीनंतर अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले की, ‘आज आमचे सर्वांचे दैवत, आमचे सर्वांचे नेते आदरणीय शरद पवार साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी अजित दादा पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, धनजंय मुंडे, दिलीप वळसे पाटील यांसह मंत्री महोदय यशवंतराव चव्हाण सेंटरला दाखल झालो. शरद पवार बैठकीसाठी येथे आले असल्याचं आम्हाला समजल्यावर आम्ही त्यांच्या भेटीची वेळ न मागता त्यांच्या भेटीकरता आलो. ही संधी साधून आम्ही त्यांची भेट घेतली’.
पवारांच्या पाया पडून आशीर्वाद मागितले
पवारांच्या पाया पडून आम्ही आशीर्वाद मागितले. आम्ही सर्वांनी साहेबांना विनंतीही केली की, आमच्या मनात त्यांच्यासाठी आदर आहेच, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ राहू शकतो त्यासाठीही योग्य विचार करावा. येत्या दिवसांत मार्गदर्शन करावं, अशी आम्ही विनंती केली आहे. पवारांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
आमचं मत ऐकून घेतलं…
आमचं जे मत होतं, विनंती होती ते ऐकून घेतलं आणि भेटीनंतर आता इथून जात आहोत. उद्यापासून राज्याच्या विधानसभेचं अधिवेशन सुरू होत आहे, सर्व मंत्री अजित दादांच्या नेतृत्त्वामध्ये आपापल्या विभागाची जबाबदारी पार पाडतील’, असे त्यांनी सांगितले.