आता वर्षातून दोनदा देता येणार CET परीक्षा; JEE प्रमाणेच दिली जाणार संधी (iStock)
पुणे : राज्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवरील जेईईप्रमाणेच दोन संधी देण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (CET) कक्षामार्फत घेण्यात येणाऱ्या पीसीएम (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित), पीसीबी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र) आणि एमबीए या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा आता वर्षातून दोन वेळा घेण्यात येणार आहेत.
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि.११) आढावा बैठक झाली. या आढावा बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, सीईटी कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई, उच्चशिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, तसेच उपसचिव अशोक मांडे आणि प्रताप लुबाळ उपस्थित होते.
हेदेखील वाचा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षा बुधवारपासून सुरू
मंत्री पाटील म्हणाले, ‘राष्ट्रीय पातळीवर जेईई परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या कामगिरीत सुधारणा करण्याची संधी मिळते. राज्यातील विद्यार्थ्यांनाही अशाच दोन संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नव्या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचा ताण कमी होईल आणि स्पर्धात्मक तयारीस अधिक वेळ मिळेल. नवीन नियमानुसार, विद्यार्थ्याने एक प्रवेश परीक्षा देणे बंधनकारक असेल, तर दुसरी परीक्षा ऐच्छिक असेल. विद्यार्थ्याने दोन्ही परीक्षा दिल्यास, दोन्हीपैकी ज्या परीक्षेत जास्त गुण मिळतील तेच गुण प्रवेशासाठी ग्राह्य धरले जातील.
पहिली प्रवेश परीक्षा एप्रिलमध्ये तर दुसरी…
सीईटी कक्षामार्फत 2026 साली पहिली प्रवेश परीक्षा एप्रिलमध्ये तर दुसरी परीक्षा मे महिन्यात घेण्यात येणार आहे. या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक आणि अर्ज प्रक्रिया सीईटी कक्ष लवकरच प्रसिद्ध करणार असल्याची माहिती दिली आहे.
मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा आजपासून
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा (जून पॅटर्न २०१३) बुधवारपासून (दि.12) सुरू होत आहेत. यासाठी चार जिल्ह्यांमध्ये समन्वय विभागाच्या अंतर्गत विशेष तयारी करण्यात आली आहे. सहायक कुलसचिव भगवान फड, राजेंद्र गांगुर्डे आणि महेंद्र पैठणे यांच्या अध्यक्षतेखाली एकूण ३३ भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत.






