संभाजीनगर : राज्यातील हजारो लोक प्रवास करताना एसटीने जाण्याला प्राधान्य देतात. एसटीने प्रवास (ST Ticket) करताना तिकीट काढताना ऑनलाईन पेमेंटची सुविधा उपलब्ध नव्हती. परिणामी, त्यांना रोख रक्कम द्यावी लागत असे. त्यात चिल्लर अभावी छोटे-मोठे वाद झाल्याचे प्रकारही अनेकदा घडले आहेत. पण आता हा त्रास दूर होणार आहे. कारण आता Google Pay, Phone Pay च्या माध्यमातून एसटीचे तिकीट काढता येणार आहे.
एसटीचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी एसटी महामंडळाच्या मुख्यालयाला तिकीट मशिन्सबाबत वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे आता नवीन कंपनीच्या माध्यमातून एसटीच्या कंडक्टरांना नवीन अँड्रॉइड तिकीट मशिन देण्यात येत आहे. मध्यवर्ती बसस्थानकात एकूण 200 मशिन पाठवण्यात आली आहेत. यातील दोन दिवसांत चार मशिन संबंधित कंडक्टरांना देण्यात आली आहेत. या नवीन मशिनच्या माध्यमातून आता एसटी कर्मचाऱ्यांना बॅटरीचाही त्रास कमी होणार आहे. तसेच येत्या काही दिवसांत या मशिनवर ऑनलाईन पेमेंटची सुविधाही सुरू करण्यात येणार आहे.
एसटीच्या कर्मचाऱ्यांना अनेकदा चिल्लरचा त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय, एसटी कर्मचाऱ्याकडे चिल्लर जास्त आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईचे अनेक प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे या सर्व बाबींची माहिती लक्षात घेता आता लवकरच Google Pay, Phone Pay च्या माध्यमातून एसटीचे तिकीट काढता येणार आहे.