सौजन्य - सोशल मिडीया
जालना : मनोज जरांगे पाटील हे अंतरवली सराटीत उपोषण करत आहेत. संभाजीराजे छत्रपती यांनी काल अंतरवलीत जात जरांगेंची भेट घेतली. जरांगेंची तब्येत खालावते आहे, त्यांना जर काही झालं तर त्याला सरकारच जबाबदार असेल, असं संभाजीराजे यावेळी म्हणाले. त्यावर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी टीका केली आहे. मिस्टर संभाजी भोसले, तुम्हाला आता राजे म्हणणार नाही. संभाजी भोसलेंनी त्यांची जात दाखवली. तुम्ही राजर्षी शाहू महाराजांचे वैचारिक वारस नाहीत, असा हल्लाबोल लक्ष्मण हाके यांनी केला आहे.
हाके नेमकं काय म्हणाले?
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी संभाजीराजे यांच्यावर निशाणा साधलाय. हाके म्हणाले, “तुम्ही राजर्षी शाहू महाराजांचे वैचारिक वारस नाही”, असा टोला देखील हाके यांनी लगावला आहे. ते म्हणाले, “आम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना राजे मानतो, इतरांना नाही. कारण रयतेचा राजा छत्रपती शिवरायांचं स्वराज्य निर्माण होण्यासाठी अठरापगड जातींच्या लोकांनी जीवाची बाजी लावली होती. तसेच आम्ही आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचे पाईक आहोत”.
चार दिवसांपूर्वी सलाईन घेतल्यानंतर उपोषण असतं का? संभाजी भोसले यांनी त्याची जात दाखवली. ओबीसी चा द्वेष दाखवून दिला आहे. ओबीसी समाज त्यांना राजा मानणार नाही. येणाऱ्या काळात ओबीसी सज्ज झाला आहे. राजा राणीच्या पोटातून जन्माला येत नाही. राजा कोणाला ठरवायचं हे आता ओबीसी ठरवेल. संभाजीराजे यांनी भेट द्यायला हवी होती. जरांगेकडे संभाजी भोसले मतांची बेरीज करायला आले, असंही लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे.
मनोज जरांगे आणि छत्रपती संभाजी राजे यांना गरिबाचा कळवळा नाही. संभाजी राजे तुम्ही बीडमध्ये आरत्या करत होते का? मराठवाड्यात दुकानावर हल्ले केले गेले. संभाजी राजे तुम्हाला राजे म्हणायला लाज वाटतं. मनोज जरांगेला मराठा समजाचा मक्ता दिलाय का? जरांगे यांनी शाहू महाराजांचा फोटो वापरला का? जरांगे आणि संभाजीराजे जरा औकातीत बोला. मी त्यांना राजा म्हणणार नाही मिस्टर संभाजी भोसले म्हणणार, असं म्हणत लक्ष्मण हाके यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्यावर टीका केली आहे.