सौजन्य - नवराष्ट्र टीम
बारामती : राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मराठा आरक्षणासाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत मुंबईमध्ये आंदोलन केले. जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर पाच दिवस आमरण उपोषण केले. यानंतर राज्य सरकारकडून जरांगे पाटील यांच्या आठ पैकी सहा मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके आक्रमक झाले आहेत. गेल्या काही दिवसाखाली ओबीसी समाजाने बारामतीत मोर्चा काढला होता. विनापरवानगी मोर्चा काढल्यामुळे पोलिसांनी लक्ष्मण हाके यांच्यासह त्यांच्यासोबतच्या इतरांवर गुन्हे दाखल केले आहेत. यावरुन आता हाके यांनी पुन्हा एकदा पवार कुटुंबीयांवर टीका केली आहे.
झक मारली आणि पवार कुटुंबाला आम्ही निवडून दिलं, अशी घाणाघाती टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बारामतीतून पवार कुटुंबीयांवर केली आहे. 5 सप्टेंबरला बारामतीमध्ये ओबीसी एल्गार मोर्चाचा आयोजन करण्यात आलं होतं, याला पोलिसांनी परवानगी नाकारली तरी देखील हा मोर्चा काढण्यात आला आणि त्यानंतर 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. लक्ष्मण हाके यांच्यासह आज 14 जण बारामती पोलीस ठाण्यामध्ये आले होते, तेव्हा आम्हाला अटक करा अशी मागणी यावेळी केली. त्यानंतर, पोलिसांकडून नोटीस देऊन त्यांना सोडण्यात आलं असलं तरी यावरून लक्ष्मण हाके यांनी गंभीर आरोप केले असून अजित पवारांच्या सांगण्यावरुनच आम्हाला अटक करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
हे सुद्धा वाचा : लातूर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे धक्के, अचानक जमीन हादरली; नागरिकांची रात्री पळापळ
हाके म्हणाले, पवार कुटुंबीयांनी आमच्या मागच्या 4 पिढ्या सडवल्या आणि पुढच्या 4 पिढ्या शिकू नये म्हणून महाज्योतीला निधी देत नाहीत, वसतिगृह बांधून देत नाहीत. एखादा पोरगा बोलायला लागला की त्याच्यावर अजित पवार गु्न्हे दाखल करतात, अशा शब्दात लक्ष्मण हाकेंनी पवार कुटुंबावरच आपण टीका का करतो हे बारामतीतून सांगितलं. अजित पवारांच्या सांगण्यावरून आमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं. तर पवार कुटुंब गेली अनेक वर्ष महाराष्ट्राच्या बोडक्यावर बसलंय, आम्ही पवारांना झक मारायला निवडून दिलं, असा शब्दात हाकेंनी आपला संताप व्यक्त केला आहे.
हे सुद्धा वाचा : कुत्रे भुंकल्याचा जाब विचारल्यामुळे राग अनावर; दोघांवर चाकूने सपासप वार केले अन्…