सासवड पोलिस ठाण्यात आकाचे वास्तव्य (फोटो- सोशल मिडिया)
सासवड/संभाजी महामुनी: राज्यातील जनतेची कामे वेळेत व्हावी, त्यांना न्याय मिळावा, यासाठी राज्य शासनाने १०० दिवसांचा आराखडा तयार केला असून या कालावधीत जास्तीत जास्त कामे करण्याचे प्रशासनाला आदेश दिले आहे. त्यामुळे महसूल, पंचायत, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद अशा सर्वच पातळीवर अधिकारी दिलेली कामे वेळेत पूर्ण करण्याच्या कामात व्यस्त आहेत. मात्र पुरंदर तालुक्यातील सासवड पोलीस ठाण्यात वेगळेच चित्र पाहायला मिळत आहेत. केवळ कागदी घोडे नाचविण्याचे काम दिसत आहे. कागदी घोडे म्हणजे कारवाईचा फार्स नसून एकमेकांची चौकशी लावण्याचे विदारक चित्र पाहायला मिळाले आहे. विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत वादातून हा प्रकार सुरु असून अधिकारी मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याने कर्मचारी हेच कारभारी आहेत काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बेकायदेशीर व्यावसायांवरील कारवाई बाबत प्रश्नचिन्ह.
मागील महिन्यात कोल्हापूर परीक्षेत्रचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी तसेच ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी १०० दिवसांच्या कार्यक्रम अंतर्गत सासवड पोलीस ठाण्याला भेट देवून कामकाजाचा आढावा घेतला. त्यावेळी उपस्थित पत्रकारांनी उपविभागीय कार्यालयाच्या समोरच बेकायदेशीर धंदे मोठ्या प्रमाणात सुरु असून तातडीने धंदे बंद करून कारवाई करण्याची मागणी केली. त्यावर आठ दिवसांत कारवाईचे अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले, मात्र तब्बल एक महिना उलटला तरी बेकायदेशीर धंदे जोमातच सुरु आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या आदेशाला पोलीस स्टेशन कडून केराची टोपली दाखवली गेल्याचे दिसून आले आहे.
पोलीस स्टेशन मध्ये ” आका ” चे वास्तव्य.
बीड जिल्ह्यात बेकायदेशीर धंद्यांना पाठबळ देणारे आका आणि बोका संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले आहेत. मात्र सासवड पोलीस ठाण्यातही एका आकाचे वास्तव्य असल्याचे दिसून येत आहे. कोणताही गुन्हा अथवा घटना उघडकीस आली की, संबंधित राजकीय पक्षाचे आका लगेच पोलिसांना भिडणार. त्यानंतर आर्थिक तडजोड किती होणार यावरून गुन्हा दाखल करायचा की करून सोडून द्यायचे याचा निर्णय घेतला जातो. त्यामुळे पोलीस ठाण्यात वास्तव्य करून बसलेल्या आकाला देणारा बोका कोण ? याची संपूर्ण तालुक्यात जोरदार चर्चा सुरु आहे.
गुन्हे उघडकीस आणणे आणि मुद्देमाल हस्तगत करण्यात अपयश. ,,,
मागील काही महिन्यात सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध भागात घरफोड्या मोठ्या प्रमाणात झाल्या. यामध्ये काही लाखांच्या रोख रकमा तसेच सोने चांदीचे दागिने मोठ्या प्रमाणात गेले. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल झाले. मात्र पुढे कोणतीही कारवाई झाल्याचे अथवा गुन्हे उघड करणे किंवा मुद्देमाल जप्त केल्याचे दिसून आले नाही.
चक्रीवर कारवाई नोंद मात्र टीव्ही दुरुस्तीची ,,,
काही दिवसापूर्वी पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याने चक्री बिंगो च्या दुकानात धाड टाकून कारवाई केली. तेथील सर्व साहित्य जप्त करून पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर आर्थिक तडजोड करून काही वेळातच पुन्हा सर्व परत केले. विशेष म्हणजे या कारवाईत कोणतेही अविद्य व्यवसाय नसून टीव्ही दुरुस्त केली जात असल्याचे दाखवले. विशेष म्हणजे सदर घटनेचा व्हिडीओ समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून एक पोलीस कर्मचारी त्यामध्ये दिसून येत असल्याने संपूर्ण तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख काय कारवाई करणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.