नवी मुंबई : तुर्भे गावातील सामंत विद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यांमध्ये शाळेच्या वेळेत वाद झाला. हा वाद काही वेळापुरता शमवण्यात आला होता. मात्र शाळा सुटल्यावर नजीकच्या मैदानात हा वाद पुन्हा उफाळून आल्याने आपापसात जोरदार भांडण झाली. ही भांडणे एवढी भीषण होती की त्यात एका १६ वर्षीय विद्यार्थ्यांचा जीव गेला असून एक विद्यार्थी जखमी झाला आहे. जखमीवर नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एपीएमसी पोलीस व गुन्हे शाखा कक्ष १ ने घटनास्थळी धाव घेतली असून पाच ते सहा विद्यार्थ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सदर घटनेचा तपास हा एपीएमसी पोलीस ठाणे व गुन्हे शाखा कक्ष एक समांतर रित्या करत आहेत.
शाळांच्या आवारात अल्पवयीन मुलांकडून मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. अनेक वेळा तर ही मुले अल्पवयीन असतात हे बघून त्यांची समजूत काढून त्यांना बाजूला केले जाते. तर हे प्रसंग शाळेच्या बाहेर घडल्याने शाळा प्रशासन देखील हात वर करत आहे. त्यामुळे शाळा सुटण्याच्या वेळेमध्ये शाळेच्या भागात पोलिसांच्या गस्तीची गरज निर्माण होऊ लागली आहे.
शाळा प्रशासनाने वेळेत पोलिसांशी संपर्क साधावा
शाळेमध्ये अथवा शाळेचे आवरामध्ये असे काही वादविवादाचे दृश्य पाहिले किंवा कानावर आले. तर त्याची कल्पना त्वरित स्थानिक पोलीस स्टेशन यांना देण्यात यावी जेणेकरून शाळा सुटल्यावर पोलीस त्या ठिकाणी गस्त घालून संभाव्य धोका टाळतील.