नाशिक : केंद्र सरकारने 31 मार्चनंतरही कांदा निर्यातबंदी कायम ठेवली आहे. केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने 22 मार्च रोजी एक अधिसूचना काढून 31 मार्च नंतरही कांदा निर्यातबंदी पुढील सूचनेपर्यंत कायम राहणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे येत्या 8 दिवसांनी तरी निर्यातबंदी हटेल आणि आपल्या उन्हाळी कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल या प्रतिक्षेत असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा हिरमोड झाला.
राज्यात कांद्याचे भाव वाढून मतांचे नुकसान होऊ नये अशी परिस्थिती केंद्राने जाणून बुजून ठेवली आहे का, निर्यातीला कोण विरोध करत आहे? असाही सवाल शेतकरी, व्यापाऱ्यांनी केंद्राला केला आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या परकीय व्यापार विभागाचे महासंचालक यांचे अतिरिक्त सचिव संतोष कुमार सरंगी यांनी अधिसूचनेत म्हटल्याप्रमाणे 7 डिसेंबर 2023 रोजी केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी लागू केली होती. ती 31 मार्च 2024 पर्यंत राहणार होती. मात्र, नव्या निर्यात धोरणानुसार पुढील सूचना येईपर्यंत ही कांदा निर्यातबंदी 31 मार्चनंतर वाढविण्यात आली असल्याचे त्यात म्हटले आहे.
एचएस कोड 07031019 अंतर्गत 31 मार्च 2024 पर्यंत वैध असलेल्या कांद्याच्या निर्यातीवरील निर्यात प्रतिबंध पुढील आदेशापर्यंत वाढवण्यात आला, असे यात म्हटले आहे.
नुकसानीत विक्री
निर्यातीसंदर्भातील सरकारच्या धरसोड वृत्तीमुळे परकीय बाजारपेठ गमावण्याची वेळ आली आहे. निर्यातबंदी कांदा नुकसानीत विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. ऑगस्टमध्ये सुरूवातीला 40 टक्के निर्यातशुल्क लागू केल्यानंतर कांद्याचे भाव पडले होते. त्या विरोधात व्यापाऱ्यांनी संप पुकारल्याने बाजारसमित्या बंदला फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला.