नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान आज सुरु आहे. तर पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी होणार आहे. त्यात नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. तत्पूर्वी कांदाप्रश्नावरून महायुतीच्या उमेदवारांना शेतकरी मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे बोगस आणि लबाड असून, त्यांना कांदे फेकून मारणार असल्याची संतप्त भावना व्यक्त केली.
दिंडोरी आणि नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी येत्या 20 तारखेला मतदान होणार आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांची सभा होणार आहे. त्यानुसार, पिंपळगाव बसवंतऐवजी नाशिकमध्ये त्यांची सभा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यादृष्टीने चाचपणीही सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी पोलीस महासंचालकांनीही ग्रामीण पोलिसांच्या सभेच्या पार्श्वभूमीवरील तयारीबाबत तीव्र नाराजीही व्यक्त केल्याचे कळते.
दरम्यान, नाशिक जिल्हा कांदा उत्पादक जिल्हा असून, कांद्यावरील निर्यातबंदीमुळे जिह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे ग्रामीण भागात महायुतीच्या उमेदवारांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.