'विरोधकांचे आरोप वैफल्यग्रस्त आणि विकासकामांत अडथळा आणणारे'; नगराध्यक्ष सुनील शिंदे यांचे विरोधकांना चोख प्रत्युत्तर
महाबळेश्वर : महाबळेश्वर पालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या आर. आर. हेरिटेज ते लॉडविक पॉईंट रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामावरून विरोधी गटाचे नगरसेवक कुमार शिंदे यांनी केलेले आरोप नगराध्यक्ष सुनील शिंदे यांनी खोडून काढले आहेत. हे आरोप पूर्णपणे निराधार, राजकीय हेतूने प्रेरित आणि शहराच्या विकासकामात खोडा घालणारे असल्याची टीका नगराध्यक्षांनी केली.
नगराध्यक्ष सुनील शिंदे यांनी म्हटले आहे की, रस्त्याच्या कामाचा दर्जा उत्तम असून सर्व तांत्रिक निकष पाळले जात आहेत. ‘पेव्हर मशीन’ आणि कामाचा दर्जा यांचा कोणताही तांत्रिक संबंध नसून, ज्या ठिकाणी भौगोलिक अडचण किंवा अरुंद रस्ता असतो, तिथे मशीन नेणे शक्य नसते. वाई-सुरूर किंवा राष्ट्रीय महामार्गावरही जिथे अडथळे असतात, तिथे मॅन्युअली काँक्रिटीकरण केले जाते. केवळ मशीन नाही म्हणून काम निकृष्ट ठरवणे हा बालिशपणा तर आहेच शिवाय हे अज्ञानपणाचे लक्षण आहे.
विरोधकांवर कडक शब्दांत प्रहार करताना नगराध्यक्ष सुनील शिंदे म्हणाले, “गेली १५ वर्षे सत्तेत असताना ज्यांना एक साधे विकासकाम करता आले नाही एकही कामाचा श्रीफळ वाढविता आला नाही आणि ज्यांच्या काळात रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली होती, त्यांनी आज होत असलेल्या विकासकामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे हास्यास्पद आहे. तुमच्या निष्क्रिय कार्यकाळामुळे महाबळेश्वर विकासात १५ वर्षे मागे गेले आहे, याची आज तुम्हाला शरम वाटली पाहिजे. अशा निष्क्रिय कारकिर्दीमुळे जनतेने तुम्हाला नाकारले, त्यातून आलेल्या वैफल्यामुळे तुम्ही हे आरोप करत आहात.”
कामाच्या गुणवत्तेबाबत स्पष्टीकरण देताना नागराध्यक्षांनी सांगितले की, आम्ही विकासकामांच्या दर्जाबाबत कधीही तडजोड केलेली नाही आणि करणार नाही. जनतेला दर्जेदार रस्ते मिळावेत हीच आमची भूमिका आहे. ज्यांना स्वतःच्या कार्यकाळात काही करता आले नाही, त्यांना आज होत असलेला विकास बघवत नाही. म्हणूनच केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि विकासकामात अडथळा आणण्यासाठी हे ‘स्टंट’ केले जात आहेत.
कामाची पोचपावती महाबळेश्वरची जनता देते
“आम्ही केलेल्या पारदर्शक कामाची पोचपावती खुद्द महाबळेश्वरची जनता देत आहे. विरोधकांच्या कोणत्याही अडथळ्याला न जुमानता शहराचा कायापालट करण्याचे आमचे स्वप्न आम्ही पूर्ण करणारच,” असा ठाम विश्वास नगराध्यक्ष सुनील शिंदे यांनी व्यक्त केला. यावेळी नगरसेवक अफजल सुतार, रोहित ढेबे, ऍड. संजय जंगम, संगीता वाडकर, विमल पार्टे, रवींद्र कुंभारदरे आदी उपस्थित होते.
कामाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड नाही
प्रशासकीय काळात शहर परिसरातील तीन रस्त्याची कामे मंजूर करण्यात आली होती. परंतु, निधी अभावी ही कामे होत नव्हती. आम्ही सत्तेवर आल्यावर मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या माध्यमातून तीन रस्त्यांसाठी निधी मिळवून काम सुरु केले. पाटील यांचे या कामावर जातीने लक्ष असून कामाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा दावा बांधकाम समितीचे सभापती अफजल सुतार यांनी पत्रकारांशी बोलताना केला केला.






