बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : महाविकास आघाडीच्या माध्यमातून चांगले काम सुरू असल्याने आपले काही खरे नाही. ही भीती सध्याच्या सत्ताधाऱ्यांना वाटल्यानेच साम, दाम, दंड या नीतीचा अवलंब करून सत्ता हस्तगत करण्यात आल्याची टीका विरोधी पक्षनेते उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. या बंडाशी आमचा कोणताही संबंध नसल्याचे सांगणाऱ्या एका नेत्याच्या पत्नीने त्यांचे पती वेशांतर करून नेत्यांना भेटायला जात होते, हे स्पष्ट केल्याने सर्व काही जनतेला कळून चुकले असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.
बारामती शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस भवन या ठिकाणी आगामी बारामती नगरपरिषद, माळेगाव नगरपंचायत, बारामती तालुका खरेदी-विक्री संघ या पंचवार्षिक निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात अजित पवार बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते, माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव, किरण गुजर, योगेश जगताप, धनवान वदक आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून सर्वोत्कृष्ट काम केले आहे. कोरोनाच्या काळात अनेक संकटे आली. मात्र, त्या संकटांना तोंड देत चांगले काम करण्याचा प्रयत्न केला. देशात चांगले काम करणाऱ्या मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे यांचे नाव आले आहे.
भीतीमुळेच शपथविधी उरकून घेतला
महाविकास आघाडी सरकारने अशा पद्धतीने चांगले काम केल्यास भविष्यात आपले काही खरे नाही, याची जाणीव सध्याच्या सत्ताधाऱ्यांना झाली असावी. त्यामुळेच बंडखोरी घडवून सत्ता हस्तगत करण्यात आली आहे. ११ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर बरंच काही अवलंबून आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी स्वतःचाच शपथविधी उरकून घेतला. मंत्रिमंडळ विस्तार ११ तारखेनंतर करण्याचा निर्णय त्यांनी या भीतीमुळेच घेतला असावा. साम, दाम, दंड या नीतीचा वापर करून विरोधकांनी करून राजकीय खेळी केल्याचा आरोप पवार यांनी यावेळी केला.
ओबीसी निकालानंतर भूमिका स्पष्ट करणार
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या घटकांना प्रतिनिधित्व देण्याबरोबरच ओबीसींना देखील लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व दिले जाईल. 15 जुलै रोजी ओबीसी आरक्षणाबाबतच्या निकालानंतर योग्य भूमिका जाहीर केली जाणार असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.
कार्यकर्त्यांनो, कामाला लागा
आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. आपण केलेल्या विकासकामांची माहिती जनतेला द्यावी. कोणताही समाजघटक दुखावू नये, याची खबरदारी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे.