सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आज तिच्या माहेरी कस्पटे कुटुंबाची भेट घेतली आणि या घटनेबाबत चिंता व शोक व्यक्त केला. या प्रकरणात पोलिसांकडून आरोपींना तत्काळ अटक न केल्याने उच्च पदस्थ व्यक्तींचा हस्तक्षेप असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः या प्रकरणाची दखल घेतली आहे, त्यामुळे वैष्णवीला नक्की न्याय मिळेल, असा विश्वास डॉ गोर्हे यांनी व्यक्त केला.
डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, पोलीस महिलांना ‘भरोसा सेल’मध्ये बोलवतात परंतु महिला दक्षता समित्यांमध्ये त्यांच्या तक्रारींवर वेळेत उत्तर मिळत नाही. जर तक्रारी वेळेवर ऐकल्या गेल्या असत्या तर अनेक घटनांपासून बचाव होऊ शकला असता. गोऱ्हेंनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली, त्यांच्या भावना समजून घेतल्या आणि कायदेशीर प्रक्रिया, बालकाच्या ताब्याबाबत न्यायालयाच्या आदेशानुसार काय करणे गरजेचे आहे, यावरही चर्चा केली.
पोलिसांकडून सांगण्यात आले की, या प्रकरणात चार्जशीट दाखल झालेली असून, साक्षीपुराव्यात कोणताही हस्तक्षेप शक्य नाही. तरीही डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले की, पाच दिवस आरोपी बाहेर कसे राहू शकले यावर प्रश्नचिन्ह आहे आणि या प्रकरणात ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या मदत केली, त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. मयुरी जगताप या वैष्णवीच्या जावेची भेट घेऊन तिला देखिल न्याय मिळवून देण्याबाबत डॉ गोऱ्हे यांनी आश्वासित केले व कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई करण्याबाबत संबंधित संरक्षण अधिकारी यांना सूचना दिल्या.
यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी मयुरी जगताप यांची भेट घेऊन देखील समुपदेशन केले. अशा हुंडाबळीच्या शिकार झालेल्या या मुलींना न्याय मिळावा यासाठी समाज म्हणून आपण सर्वजण निष्पक्षपणे त्यांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे, असेही त्या म्हणाल्या.