विराट कोहली आणि डॅरिल मिशेल(फोटो-सोशल मीडिया)
ICC ODI Rankings : आयसीसीकडून बुधवारी ताजी रँकिंग जाहीर करण्यात आली आहे. या रंकिंगमध्ये भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीला मोठा झटका बसला आहे. विराट कोहली आता पहिल्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर घसरला असून न्यूझीलंडचा फलंदाज डॅरिल मिशेल वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे एकदिवसीय रँकिंगमध्ये डॅरिल मिशेल पहिल्यांदाच अव्वल स्थानी जाऊन पोहचला आहे.
हेही वाचा : IND vs NZ 1st T20I : ‘वर्ल्डकपपूर्वी भारतामध्ये खेळणे….’ न्यूझीलंडचा कर्णधार सँटनरने व्यक्त केल्या भावना
डॅरिल मिशेलने अलिकडच भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत शानदार प्रदर्शन केले. त्याने या सामन्यात ३०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. या प्रभावी कामगिरीमुळे त्याने आयसीसी एकदिवसीय रँकिंगमध्ये लक्षणीय उडी मारली. मिशेल ८४५ गुणांसह पहिल्या क्रमांकावर जाऊन पोहोचला आहे, तर विराट कोहली दुसऱ्या स्थानी घसरला आहे. विराट कोहली सध्या ७९५ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे.
रोहित शर्माला देखील या रँकिंगमध्ये नुकसान सहन करावे लागले. रोहित शर्माची रँकिंग आता वनडे रँकिंगमध्ये चौथ्या क्रमांकावर घसरली आहे. रोहित शर्माची न्यूझीलंडविरुद्धची समाधानकारक नव्हती त्याचा फटका त्याला रँकिंगमध्ये बसला आणि तो चौथ्या स्थानावर घसरला. आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत टॉप १० मध्ये चार खेळाडूंचा समावेश आहे, तर श्रेयस अय्यर ११ व्या स्थानावर विराजमान आहे. श्रेयस अय्यरची मालिका देखील चांगली गेली नाही. ज्यामुळे त्याला एका स्थानाने मागे यावे लागले.
डॅरिल मिशेलने भारतात भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत एकूण ३५२ धावा फटकावल्या. त्याने तीन सामन्यांमध्ये दोन शतके लगावली आहेत तर एक अर्धशतक लगावले आहे. मिशेलच्या कामगिरीमुळे न्यूझीलंडने पहिल्यांदाच भारतात एकदिवसीय मालिका जिंकली आणि न्यूझीलँडने ही मालिका २-१ अशी जिंकली. उत्कृष्ट कामगिरीसाठी डॅरिल मिशेलला मालिकावीराच्या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले.
विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत देखील शानदार कामगिरी बजावली. तो धावांच्या बाबतीत मालिकेत डॅरिल मिशेलच्या मागे दुसऱ्या स्थानावर राहिला, कोहलीने तीन सामन्यांमध्ये २४० धावा केल्या, ज्याची सर्वोच्च धावसंख्या १२४ राहिली आहे. त्याने ८०.०० च्या सरासरीने आणि १०५.२६ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली.






