Para-athlete Sachin Khilari gets a warm welcome in Pune Jubilation from Azam Sports Academy One lakh check handed over
पुणे : पॅरिस येथे नुकत्याच झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत एफ ४६ प्रकारात गोळाफेकमध्ये १६.३२ मीटरची गोळाफेक करून सचिन खिलारीने भारताला रौप्यपदक मिळवून दिले. त्या कामगिरीनंतर प्रथमच सचिन खिलारी पुण्यात आला होता. सचिन सराव करीत असलेल्या आझम स्पोर्ट्स अकादमीच्या वतीने यावेळी त्याची महात्मा गांधी रास्ता, कॅम्प ते आझम कॅम्पस अशी मिरवणूक काढली होती. मिरवणुकीनंतर झालेल्या कार्यक्रमात सचिनने उपस्थित असलेल्या युवा खेळाडूंशी संवाद साधला.
आझम स्पोर्ट्सकडून 1 लाखाचा धनादेश
यावेळी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, उपाध्यक्षा आबेदा इनामदार, सदस्य एस ए इनामदार, सचिनचे प्रशिक्षक अरविंद चव्हाण, आझम स्पोर्टस अकादमीचे संचालक डॉ. गुलजार शेख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी सचिन खिलारीला आझम स्पोर्ट्स अकादमीच्या वतीने एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.
….. अन् रौप्यपदक मिळविण्यात यशस्वी
यावेळी बोलताना सचिन म्हणाला, वातावरणाशी जुळून घेता यावे यासाठी आम्ही स्पर्धेच्या ठिकाणी दाखल झालो होतो. स्पर्धेच्या एक दिवस आधी आम्ही मैदानावर गेलो होतो, त्यावेळी तेथील प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद नक्कीच आम्हाला प्रेरणा देणारा होता. याच प्रेरणेमुळे रौप्यपदक मिळविण्यात यशस्वी झालो.
डॉ. इनामदार सर यांनी उभा केला शेड
स्पर्धेपूर्वी सराव करण्यासाठी आम्हाला जर्मनीला पाठविण्यात येणार होते, मात्र मी आझम स्पोर्ट्स अकादमीमध्येच सराव करण्याचे निश्चित केले होते. डॉ. इनामदार सर यांनी उभे करून दिलेल्या शेडमध्येच मी सराव केला. याच गोष्टीचा मला मोठा फायदा झाला. पावसामुळे सर्वांचे सराव बंद होते, मात्र मी एकटा शेडमध्ये सराव करत होतो, असे सचिन खिलारीने बोलताना सांगितले.
डॉ. पी. ए. इनामदार म्हणाले, भारतीय महिला संघात खेळणारी किरण नवगिरे आणि पॅरालिम्पिक रौप्यपदक विजेता सचिन खिलारी या दोन्ही खेळाडूंना आवश्यक असलेल्या सोइसुविधा आम्ही उपलब्ध करून दिल्या. याचा फायदा त्यांना मोठ्या प्रमाणात झाला आहे. या दोन्ही खेळाडूंनी आझम कॅम्पसचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले असून यांच्याकडून युवा खेळाडूंना नक्कीच प्रेरणा मिळेल, असा मला विश्वास आहे.