खासदार श्रीकांत शिंदे (फोटो- सोशल मीडिया)
इंडोनेशिया येथे जाणाऱ्या शिष्टमंडळाचे करणार नेतृत्व
पार्लमेंटरी फ्रेंडशिप ग्रुप’मध्ये डॉ. श्रीकांत शिंदे यांची नियुक्ती
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या पुढाकाराने स्थापन झाली समिती
कल्याण: ऑपरेशन सिंदूरच्या शिष्टमंडळामधील सक्रिय आणि यशस्वी सहभागानंतर कल्याण लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे पुन्हा एकदा नेतृत्व करण्याची एक महत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आलेल्या ‘पार्लमेंटरी फ्रेंडशिप ग्रुप’मध्ये डॉ. शिंदे यांचीही निवड करण्यात आली आहे. याअंतर्गत विविध शिष्टमंडळ स्थापन करण्यात आले असून यातील इंडोनेशिया देशाचा दौरा करणाऱ्या शिष्टमंडळाचे नेतृत्व हे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे करणार आहेत.
ऑपरेशन सिंदूरअंतर्गत विविध पक्षांचे खासदार एकत्र येत भारताचे एकसंघ प्रतिनिधित्व जगासमोर मांडत होते. यावेळी खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी एका शिष्टमंडळाचे नेतृत्व केले होते. यावेळी त्यांनी यूएई, सिएरा लिनोन, लायबेरिया, डीआर काँगो या देशांमध्ये भेट दिली होती. आणि ऑपरेशन सिंदुरबाबत भारताची भूमिका या सर्व देशांमध्ये ठामपणे मांडली होती. त्याच धर्तीवर आता पार्लमेंटरी फ्रेंडशिप ग्रुप्सच्या माध्यमातून जागतिक पातळीवर भारताची संसदीय कूटनीती अधिक मजबूत करण्याचा हा महत्त्वाचा प्रयत्न केला जात आहे. भारताचे विविध देशांशी संसदीय संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवण्यात येत आहे. याअंतर्गत विविध पक्षांतील खासदारांचा समावेश असलेली शिष्टमंडळे ६० हुन अधिक देशांचा दौरा करणार आहे.
Shrikant Shinde : “आधी स्वत:चे घर सांभाळा मग देशाचा विचार करा..”, डॉ. श्रीकांत शिंदे यांची राहुल गांधींवर घणाघाती टीका
या दौऱ्यादरम्यान व्यापार, तंत्रज्ञान, शिक्षण, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि द्विपक्षीय सहकार्य या विषयांवर सखोल चर्चा केली जाणार आहे. यामध्ये रविशंकर प्रसाद, पी. चिदंबरम, राम गोपाल यादव, टी.आर. बालू, सुप्रिया सुळे, शशी थरूर, अनुराग ठाकूर, असदुद्दीन ओवैसी, अखिलेश यादव, डेरेक ओ’ब्रायन, मनीष तिवारी, अभिषेक बॅनर्जी, कणिमोळी, गौरव गोगोई यांसारख्या दिग्गज नेत्यांपासून ते डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या सारख्या युवा खासदारांपर्यंत व्यापक प्रतिनिधित्व या गटांमध्ये दिसून येत आहे.
यामध्ये इंडोनेशिया, श्रीलंका, जर्मनी, न्यूझीलंड, स्वित्झर्लंड, दक्षिण आफ्रिका, भूतान, सौदी अरेबिया, इस्रायल, मालदीव, अमेरिका, रशिया, युरोपियन संसद सदस्य देश, दक्षिण कोरिया, नेपाळ, युनायटेड किंगडम, फ्रान्स, जपान, इटली, ऑस्ट्रेलिया, ग्रीस, सिंगापूर, ब्राझील, व्हिएतनाम, मेक्सिको, इराण आणि यूएई अशा विविध महत्त्वाच्या देशांसोबत संवाद साधला जाणार आहे.
युवा आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास टाकत केंद्रीय पातळीवरून त्यांना ही महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे भारताचा आवाज जागतिक पातळीवर अधिक प्रभावीपणे पोहोचणार असल्याचे मानले जात आहे. तसेच खासदार डॉ. शिंदे यांच्या या नव्या आंतरराष्ट्रीय भूमिकेमुळे त्यांच्या राजकीय प्रवासाला नवे बळ मिळणार असून ते जागतिक पातळीवर आपला आणखी एक ठसा उमटवण्यासाठी सज्ज झाले आहेत.
Shrikant Shinde : “बाळासाहेबांचा मतदानाचा हक्क रद्द करणाऱ्यांचा उबाठाला विसर”, श्रीकांत शिंदे यांची सडकून टीका
या उपक्रमाविषयी बोलताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी स्पष्ट केले की, या माध्यमातून भारतीय खासदारांना विविध देशांतील संसद सदस्यांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. उत्कृष्ट संसदीय कार्यपद्धतींची देवाणघेवाण, संसद ते संसद आणि जनता ते जनता या स्तरावर संवाद वाढवणे, तसेच पारंपरिक राजनैतिक प्रयत्नांसोबत संसदीय कूटनीतीला चालना देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. एकूणच, या पुढाकारामुळे भारताची जागतिक उपस्थिती अधिक बळकट करण्यास आणि संसदीय कूटनीतीला नवे बळ देण्यास महत्त्वपूर्ण चालना मिळणार आहे.






