Ladki Bahin Yojna: खात्यात ३००० रुपये जमा होणार? पण 'या' त्रुटी असल्यास लाभापासून मुकणार; लाडक्या बहिणींनो, तातडीने करा 'हे' काम
राज्यातील सुमारे २६ लाख लाभार्थी महिलांनी अजूनही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. या महिलासांठी सरकारने ३० एप्रिल २०२६ ही अंतिम मुदत दिली आहे. जर या मुदतीत ई-केवायसी पूर्ण झाले नाही, तर या महिलांना योजनेचे पुढील हफ्ते बंद होऊ शकतात किंवा त्या कायमच्या अपात्र ठरू शकतात.
नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला अनेक महिलांच्या खात्यात फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे थकीत पैसे एकत्रितपणे ३००० रुपये जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, या लाभासाठी ई-केवायसी आणि बँक खाते आधारशी लिंक असणे अनिवार्य आहे. ज्या महिलांच्या अर्जात काही तांत्रिक त्रुटी आहेत, त्यांनाही ही दुरुस्ती करण्याची ही शेवटची संधी आहे.
महिलांनी अधिकृत पोर्टल किंवा ‘नारी शक्ती दूत’ ॲपवर जाऊन आपले ई-केवायसी स्टेटस तपासावे.
बँक खाते आधार कार्डशी लिंक असल्याची खात्री करावी.
काही त्रुटी असल्यास जवळच्या सेतू केंद्रात किंवा अंगणवाडी सेविकांच्या मदतीने ३० एप्रिलपूर्वी दुरुस्ती करून घ्यावी.
वेळेत ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास लाडक्या बहिणींच्या खात्यात येणारे १५०० रुपये कायमचे बंद होऊ शकतात, अशी शक्यता महिला व बालविकास विभागाने व्यक्त केली आहे.
महिला व बाल विकास विभागाने यासाठी मुदत तीन वेळा वाढवली होती. मात्र, आता 30 एप्रिल 2026 ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली असून, त्यानंतर ई-केवायसी पूर्ण न केलेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
सध्या (27 एप्रिलपर्यंत) अंतिम मुदतीसाठी अवघे चार दिवस शिल्लक असूनही मोठ्या संख्येने लाभार्थींनी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे एप्रिलनंतर लाखो महिला या योजनेतून अपात्र ठरण्याची शक्यता महिला व बाल विकास विभागाने व्यक्त केली आहे.
30 एप्रिल रोजी बँक बंद होईपर्यंत ई-केवायसी पडताळणीची प्रक्रिया सुरू राहणार आहे. या कालावधीत प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधित 26 लाख महिलांना कायमस्वरूपी योजनेतून वगळले जाऊ शकते.
यामुळे ज्या लाभार्थींनी अद्याप ई-केवायसी केलेली नाही, त्यांनी तातडीने आवश्यक कागदपत्रांसह प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा त्यांना आर्थिक मदतीपासून वंचित राहावे लागू शकते, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.






