Photo Credit- Social Media नागपूर दंगलीचा मोठा पुरावा पोलिसांच्या हाती
Nagpur News- नागपूर: औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्द्यावरून नागपूरमध्ये सोमवारी रात्री उसळलेल्या हिंसाचारानंतर परिस्थिती आता हळूहळू नियंत्रणात आली आहे. महाल परिसरात काल रात्री मोठ्या प्रमाणावर दगडफेक झाली होती. हिंसक जमावाने क्रेनसह अनेक वाहने पेटवून दिली, ज्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दगडांचा खच पडला होता. मंगळवारी सकाळी नागपूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हे दगड हटवून रस्ते साफ केले, तसेच जाळपोळीच्या खुणाही मिटवण्यात आल्या. नागपूरमधील जनजीवन लवकरात लवकर पूर्वपदावर येण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे.
नागपूर शहरातील झोन 3, 4 आणि 5 या भागांतील 11 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या भागांमध्ये नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे तसेच पाच किंवा त्याहून अधिक जणांनी एकत्र न जमण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत. दरम्यान, उर्वरित नागपूरमध्ये जनजीवन सुरळीत असून सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू आहे. नागरिक नेहमीप्रमाणे आपल्या कामासाठी बाहेर पडत आहेत. मात्र, शहरातील वातावरण अद्याप तणावपूर्ण असल्याचे दिसून येत आहे.
नागपूरमधील कालच्या हिंसाचारानंतर पोलिसांनी संपूर्ण रात्री कोम्बिंग ऑपरेशन राबवले. सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करून दंगल भडकवणाऱ्या अनेक जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आतापर्यंत 65 संशयितांना गणेशपेठ पोलीस ठाण्यात आणून त्यांची चौकशी सुरू आहे.
प्राथमिक तपासानुसार, महाल परिसरातील हिंसाचारात सहभागी असलेल्यांपैकी अनेक जण उत्तर नागपूरमधील कळमना आणि इतवारी भागातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांची विविध पथके संशयितांचा शोध घेत असून घटनास्थळी काही वाहने तसेच ओळखपत्रे आणि आधारकार्ड आढळली आहेत. अचानक कारवाई झाल्याने अनेक दंगलखोर आपली दुचाकी जागीच सोडून पळून गेले. तसेच काहींची ओळखपत्रे पडल्याने ती पोलिसांच्या हाती लागली आहेत.
भालदारपुरा परिसर हा सर्वाधिक प्रभावित झाला असला, तरी चिटणीस पार्क आणि हंसापुरी भागातही जमावाने दगडफेक व वाहनांची जाळपोळ केली. या घटनेत सामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही दंगलखोरांनी वाहनांमध्ये कापडाचे बोळे आणि पेट्रोल बॉम्ब फेकून आगी लावल्या. मोठा जमाव असल्याने परिस्थिती नियंत्रणात आणताना पोलिसांना अडचणींचा सामना करावा लागला, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.
संध्याकाळी मोठ्या प्रमाणावर जमाव कुठून आला, याची कोणालाही माहिती नव्हती. मिळालेल्या माहितीनुसार, मोमिनपुरातून अग्रसेन चौक मार्गे शेकडो लोक महाल परिसरात दाखल झाले. यामुळे पोलिसांची गुप्तचर यंत्रणा संपूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसून आले. मोठ्या संख्येने लोक एकत्र आल्याने परिसरातील तणाव वाढला. परिस्थिती हाताळण्यासाठी उशिरापर्यंत पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. तसेच शहरातील सर्व पोलीस ठाण्यांतून अतिरिक्त फोर्स घटनास्थळी पाचारण करण्यात आला.