मंचर : नागापूर (ता. आंबेगाव) येथे अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असणारे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू करावे, अशी मागणी बिरसा ब्रिगेड आणि पुणे जिल्हा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय थोरात यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
यासाठी बिरसा ब्रिगेड आंबेगाव तालुक्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रवीण पारधी यांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. राज्यामध्ये पोलीस भरती जाहिरात झालेली असताना अकोले तालुक्यातील प्रकल्पा अंतर्गत असणारे पोलीस भरतीपूर्व केंद्र सुरू आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून नागापूर येथील केंद्र मात्र बंद अवस्थेत आहे. कित्येक कोटी रुपये खर्च करून बांधलेली भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राची इमारत धूळ खात पडून आहे. हे केंद्र बंद राहण्याला शासनाची अत्यंत कमी तरतूद असल्याचे कारण आहे. कमी बजेटमुळे हे प्रशिक्षण घेण्यासाठी कोणीही तयार होत नाही.
बिरसा ब्रिगेडकडून पाठपुरावा
याबाबतचा पाठपुरावा संघटना करत आहे. यासाठीच दोन दिवसांपूर्वी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष शशिकांत करवंदे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हाध्यक्ष प्रवीण पारधी यांनी भेट घेतली होती. हा प्रश्न सोडवण्यासाठी आकस्मिक खर्चाची तरतूद करण्याबाबत झिरवाळ यांनी आदिवासी सचिव यांच्याशी चर्चा केली होती. यावेळी बिरसा ब्रिगेडचे आंबेगाव तालुका अध्यक्ष आनंद मोहरे, कार्याध्यक्ष सनी असवले, सचिव प्रवीण वाजे, मातृशक्ती उमाताई मते, ज्ञानेश्वर अनेक कॅगले तसेच आदिवासी विचारमंचचे प्रदीप पारधी व मच्छिन्द्र लोहोकरे उपस्थित होते.