मेढा : सातारा-महाबळेश्वर रोडवर रस्त्याकडेला वाहने उभी करण्यास मेढा पोलीस ठाण्याकडून विरोध करण्यात येत असून, पार्किंगची सोय नसल्याने वाहनाधारकातून कारवाईबाबत नाराजी व्यक्त होत आहे. मेढा येथील बाजारपेठ मुख्य सातारा-महाबळेश्वर रोडवर असून, मुख्य रोडवर वाहन पार्किंग करूनच ग्राहक खरेदीसाठी बाजारपेठ फेरफटका मारत असतो. बाजारपेठ तशी छोट्या खाणी असून, दोन-चार मोठी किराणा दुकाने सोडली तर बाजारपेठेत मंदी आहे. परंतु, असे असताना सुद्धा बाजारपेठेत वाहनांची वरदळ आहे.
मेढा हे नगरपंचायतीचे कार्यक्षेत्र असून, या ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली नसल्याने वाहने रस्त्याच्या कडेला उभी राहत आहेत. पार्किंग, स्वच्छतागृहे याबाबत नगरपंचायत उपाययोजना करताना दिसत नाही. परंतु, शासन आदेशाची अंमलबजावणी करताना दिसत आहे. त्यामुळे जनतेमध्ये नाराजीचा सूर आहे.
सातारा-महाबळेश्वर रोडवर अस्ताव्यस्त पार्किंग करणाऱ्या वाहनधारकांवर मात्र मेढा पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून, रस्त्यावर वाहने न उभी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या मुख्य रस्त्यावर अजून पार्किंगचे पट्टे, डिव्हायडर अपूर्ण आहेत. अजूनही रस्त्याचे दुरुस्ती काम सुरु आहे अशातच पोलिसांनी उगारलेल्या कारवाईबाबत माजी सभापती बापुराव पार्टे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पार्किंगची योग्य दिशा ठरविण्यात यावी, अशी मागणी सुद्धा बापूराव पार्टे यांनी केली आहे.
मेढा येथील पोलीस परेड ग्राऊंडमध्ये वाहने पार्किंग केल्यास वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने यांनी सांगितले. आज अमोल माने यांनी वाहनासह मुख्य बाजारपेठेत दौरा करून वाहनधारकांना स्पिकरद्वारे सूचना केल्या. त्यामुळे आता रस्त्याकडेला वाहन उभे करताना पोलीसांच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. ट्रॅफिक पोलिसांच्या सूचनाकडेही वाहनधारक दुर्लक्ष करताना दिसत असल्याने सहाय्यक पोलीस निरिक्षक अमोल माने यांनी आज प्रत्यक्ष कारवाईची मोहीम उघडून वाहनधारकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला.