Nanded News: नांदेड गुन्हे शाखेच्या खुर्चीसाठी 'पडद्याआड' खलबते; अधिकाऱ्यांच्या बदल्यांमागे स्थानिक राजकीय खेळी
खंडेराय यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला होता, त्यामुळे बदली ही नियमित मानली जाऊ शकते. मात्र, या कालावधीत नांदेडमध्ये वाढलेली गुन्हेगारी हा गंभीर मुद्दा ठरला. विशेषतः अवघ्या ७० तासांत घडलेले ४ खून राज्यभर चर्चेचा विषय बनले. या घटनांतील आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. दोन्ही घटनांतील आरोपींना अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आले, मात्र एकापाठोपाठ दोन घटना घडल्याने त्यांची चर्चा मोठ्या प्रमाणावर झाली. त्याचे प्रत्यक्ष किंवा अपत्यक्ष खापर गुन्हे शाखेवर फोडण्यात काही जणांना यश आले.
बिलोली पालिका निवडणुकीशी ही खंडेराय यांचा संबंध जोडला जात आहे. खंडेराय आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा पालिका निवडणुकीत कथित हस्तक्षेप चर्चेत राहिला. त्याचवेळी अतुल भोसले यांनी संतोष कुलकर्णी यांना दिलेली अप्रत्यक्ष साथ महत्त्वाची ठरल्याची चर्चा आहे. पत्नीला नगराध्यक्षपदी आणि पूर्ण सत्ता हस्तगत केल्यानंतर संतोष कुलकर्णी यांचे थेट मुख्यमंत्री स्तरावर संबंध प्रस्थापित झाले आणि या राजकीय जवळिकीचा परिणाम प्रशासकीय निर्णयांवर झाल्याचे बोलले जाते.
याच पार्श्वभूमीवर अतुल भोसले यांना स्थानिक गुन्हे शाखेची जबाबदारी देण्यात आली असून, ही त्यांना मिळालेली ‘राजकीय परतफेड’ असल्याचेही मत व्यक्त केले जात आहे. दुसरीकडे, खंडेराय यांची बदली ही त्यांना दिलेला राजकीय दणका म्हणून पाहिली जात आहे, या पदासाठी अनेक अधिकारी इच्छुक होते. अनेक जण देव पाण्यात ठेवून होते, त्यात जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक बोलमवाड यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, धर्माबादचे उपनगराध्यक्ष शंकर अण्णा यांच्याशी असलेले त्यांचे ‘जिव्हाळ्याचे संबंध’ आणि काही अन्य कारणांमुळे ते या शर्यतीत मागे पडल्याची चर्चा रंगली आहे.
दरम्यान, अतुल भोसले यांनी पदभार स्वीकारला असला तरी त्यांच्या समोर मोठे आव्हान उभे आहे.
वाढती गुन्हेगारी आटोक्यात आणणे, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे आणि पोलिस प्रशासनावरील विश्वास पुनस्र्स्थापित करणे ही त्यांच्यासाठी खरी कसोटी ठरणार आहे.
स्थानिक गुन्हे शाखेची खुर्ची ही नेहमीच संवेदनशील आणि दबावाखाली काम करणारी मानली जाते.
एकूणच, नांदेडमधील या बदल्या केवळ औपचारिक नसून त्यामागे राजकीय आणि प्रशासकीय समीकरणांचा गुंतागुंतीचा खेळ दिसून येतो.
आता सर्वांचे लक्ष अतुल भोसले यांच्या कामगिरीकडे लागले असून, येणारा काळच या निर्णयाचे खरे परिणाम स्पष्ट करणार आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षकपदी अतुल श्रीधर भोसले यांनी पदभार स्वीकारला असून त्यांच्या नियुक्तीमुळे विभागाच्या कामकाजाला नवे बळ मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. भोसले यांनी यापूर्वी नवी मुंबई, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण तसेच एसीबी पुणे येथे विविध पदांवर कार्य करत व्यापक अनुभव संपादन केला आहे. सोलापूर ग्रामीण येथे स्थानिक गुन्हे शाखा तसेच वळसंग पोलीस ठाण्याचा प्रभारी म्हणून त्यांनी प्रभावी कामगिरी बजावली.
तसेच पुणे ग्रामीणमध्ये दौड व शिक्रापूर पोलीस ठाण्यातील कामकाजही त्यांनी यशस्वीरीत्या सांभाळले. गुन्हेगाराविरोधात प्रतिबंधक कारवाईत भोसले यांचा विशेष ठसा उमटला आहे. दोन किया त्यापेक्षा अधिक गुन्हे करणाऱ्या आरोपींवर त्यांनी कठोर कारवाई करत ‘टू प्लस’ आरोपीना लक्ष्य करणारी विशेष मोहीम राबवली. या अंतर्गत आरोपींचा मागोवा घेण्यासाठी त्यांनी वेबसाईट व मोबाईल अॅप विकसित करण्याची अभिनव संकल्पना राबवली, जी संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे. त्यांच्या या अनुभवामुळे नांदेड जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी अधिक प्रभावी आणि तंत्रज्ञानाधारित कारवाई होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.






