बारामती : नेहमी सार्वत्रिक कार्यक्रमांपासून नेहमी दूर असणाऱ्या, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा(काकी) पवार यांना बारामती शहरातील वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागले, शहरातील शिवाजी चौकात वाहतूक कोंडी झाल्याने त्या स्वतः खाली उतरून वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.
साहेबांच्या पत्नी समोर दिसल्याने वाहनचालकांनी देखील त्यांचा आदर करत वाहतूक सुरळीत करण्यास सहकार्य केले. बारामती शहरात काही ठिकाणी विकासकामे सूरू आहेत. त्यातच सध्या दिवाळीमुळे बारामती शहरातील सर्व रस्ते वाहनांच्या गर्दीने फुलले आहेत. या वाहतुकीचा फटका सर्वच वाहन चालकांना बसत आहे. गुरुवारी (दि.२१) प्रतिभा पवार व खा.सुप्रिया सुळे यांना देखील या वाहतुकीचा मनस्ताप सहन करावा लागला. दिवाळीमुळे संपूर्ण पवार कुटुंबीय बारामतीमध्ये आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे हे बारामती परिसरातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. गुरुवारी (दि २१) प्रतिभा (काकी ) पवार या इंदापूर रोड वरील प्रशासन भवन समोरील रस्त्यावरुन माळेगाव रोडवरील त्यांच्या गोविंद बाग निवास स्थानाकडे आपल्या वाहनातून जात होत्या. मात्र प्रचंड वाहतुक कोंडीमुळे वाहने बराच वेळ थांबली होती. लांब रांगा लागलेली वाहने जागची हलायला तयार नाहीत, हे लक्षात आल्यावर प्रतिभा काकींनी स्वतः गाडीतून उतरून शिवाजी चौकात दु.१२ वाजण्याच्या सुमारास वाहतूक कोंडी सुरळीत केली.तर दोन वाजण्याच्या सुमारास खा.सुप्रिया सुळे जवळपास अर्धा तास वाहतुक कोंडीत अडकल्यावर त्यांनी बारामती शहर पोलिसांना फोन केल्यावर पोलिसांनी त्यांच्या वाहनाला रस्ता करुन दिला.दर वर्षी सर्व पवार कुटुंबीय आपल्या राजकारण व व्यवसायातुन वेळ काढत पवार कुटुंब दिवाळी सण साजरा करण्यासाठी काटेवाडी,बारामती व गोविंद बाग येथे एकत्र येतात आता त्यांना देखील बारामती शहरातुन प्रवास करताना बेशिस्त वाहतुक कोंडीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान वाहनांच्या मोठ्या संख्येमुळे बारामती शहरातील रस्ते कमी पडू लागले असून, दिवाळी मुळे या वाहतुकीत आणखी मोठी भर पडली आहे. बारामती शहरात अनेक वेळा वाहन चालकांना या वाहतूक समस्येला तोंड द्यावे लागते. बारामती शहरातील वाढणारी वाहतूक समस्या बारामतीकरांना डोकेदुखी ठरली आहे. बारामती शहरात गुरुवारी स्वतः प्रतिभा पवार यांना वाहतूक समस्येचा अनुभव आला असून त्यांनी जी वाहतूक सुरळीत करण्यासाठी केलेल्या प्रयत्नाची चर्चा बारामती परिसरात सुरू आहे.