संग्रहित फोटो
कराड : जम्मू काश्मीरमध्ये दहशदवादी हल्ला करुन अशांतता निर्माण करण्यात आली आहे. पहलगाम भागात भीषण दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात हिंदू पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले. यामध्ये आतापर्यंत 28 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सहा महाराष्ट्रातील पर्यटकांचा समावेश आहे. या घटनेचे तीव्र पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील पडत आहेत. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यात काही पर्यटकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असताना महाराष्ट्रातील गेलेल्या पर्यटकांचे कुटुंबीय चिंतेत आहेत. यावरुन आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट परराष्ट्र सचिवांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे.
जम्मू काश्मीरमध्ये कराड व सातारा येथील पर्यटक अडकल्या माहिती मिळताच राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट त्यांच्याशी संपर्क साधून तेथील परिस्थितीची माहिती घेतली. तसेच याप्रश्नी थेट परराष्ट्र सचिवांना फोन करून जम्मू काश्मीरमधील पहलगाम, श्रीनगर येथे अडकलेल्या पर्यटक नागरिकांना सुखरूप मुंबईला पोहोचविण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करावी, अशी मागणीही केली आहे. कराडकरांसाठी त्यांनी दाखवलेल्या तत्पर्तेबद्धल कराडकर नागरिकांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात अनेक पर्यटकांचा मृत्यू झाला असून अनेक पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे देशातील अनेक पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये अडकले असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामध्ये कराड व साताराचे सुद्धा पर्यटक अडकल्याची माहिती मिळताच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडचे पर्यटक महेश कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधून त्याच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी अजूनही कराडचे पर्यटक मदतीच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती कुलकर्णी यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना दिली.
यावेळी पृथ्वीराज चव्हाणांनी कुलकर्णी यांना आधार देत संयम ठेवण्याची विनंती केली. तसेच तुम्हाला मदत नक्की मिळेल. तुम्ही लवकरात लवकर कराडला पोहचाल, यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे आश्वासन पृथ्वीराज चव्हाणांनी दिले. कुलकर्णी यांच्यासोबत बोलणे झाल्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांनी तात्काळ परराष्ट्र सचिव व महाराष्ट्राच्या सचिवांशी संपर्क साधून कराडसह महाराष्ट्रातील सुद्धा पर्यटकांना लवकरात लवकर आणण्यासाठी सरकारने विशेष विमानाची व्यवस्था करण्याची मागणी यावेळी केली. प्रशासनाने जलद यंत्रणा कामाला लावावी, असे सांगून कराड व सातारामधील अडकलेल्या पर्यटकांची यादी सचिवांना पाठवली आहे. त्यानुसार महेश कुलकर्णी यांना संपर्क करून माहिती दिली. अगदी डायरेक्ट पुणे किंवा मुंबई पर्यंत जरी व्यवस्था नाही झाली, तरी दिल्लीपर्यंत तरी या तुमच्या सर्वांची राहण्याची व्यवस्था दिल्लीत केली जाईल, असा आधारही पृथ्वीराज चव्हाणांनी कराडच्या कुलकर्णी व क्षीरसागर कुटुंबियांना दिला आहे.