'तर तुमच्या तंत्रज्ञानाला काय चाटायचं का?' मोशी दुर्घटनेवरून रोहित पवारांचा राज्य सरकारवर निशाणा, 64 तास उलटूनही बचावकार्य सुरूच !
पुण्यातील पिंपरी-चिंचवडमधील मोशी (Pune Moshi Building Collapse) येथे झालेल्या भीषण इमारत दुर्घटनेला तब्बल 64 तास उलटले असून, बचावकार्य अद्यापही युद्धपातळीवर सुरू आहे. यावरून आता मोठ्या प्रतिक्रिया यायला लागल्या असून शासन आणि प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अश्यातच, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी यावरून राज्य सरकारवर चांगलेच ताशेरे ओढले आहेत.
रोहित पवारांनी आपल्या अधिकृत ‘X ‘ अकाऊंटवरून राज्य सरकारवर गंभीर सवाल उपस्थित केले आहेत. डिजिटल इंडिया, बुलेट ट्रेन, इंजिनिअरिंग मार्वल असलेला मिसिंग लिंग प्रकल्प यांचा डांगोरा पिटत हायटेक तंत्रज्ञानाच्या गप्पा झोडणाऱ्या राज्य सरकारला ४ दिवसांपासून इमारत कोसळल्याने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ८ कामगारांना अजून बाहेर काढता आलं नसल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
रोहित पवार म्हणाले, “डिजिटल इंडिया, बुलेट ट्रेन, इंजिनिअरिंग मार्वल असलेला मिसिंग लिंग प्रकल्प यांचा डांगोरा पिटत हायटेक तंत्रज्ञानाच्या गप्पा झोडणाऱ्या राज्य सरकारला ४ दिवसांपासून इमारत कोसळल्याने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ८ कामगारांना अजून बाहेर काढता आलं नाही.. असं असेल तर तुमच्या तंत्रज्ञानाला काय चाटायचं का? कामगार आहेत म्हणून त्यांच्या जीवाची काहीच किंमत नाही का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
डिजिटल इंडिया, बुलेट ट्रेन, इंजिनिअरिंग मार्वल असलेला मिसिंग लिंग प्रकल्प यांचा डांगोरा पिटत हायटेक तंत्रज्ञानाच्या गप्पा झोडणाऱ्या राज्य सरकारला ४ दिवसांपासून इमारत कोसळल्याने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ८ कामगारांना अजून बाहेर काढता आलं नाही.. असं असेल तर तुमच्या तंत्रज्ञानाला काय… — Rohit Pawar (@RRPSpeaks) July 11, 2026
ते पुढे म्हणाले, ” काही दिवसांपूर्वी कुदळवाडी भागात लोकांच्या राहत्या घरांवर आणि छोट्या-मोठ्या व्यवसायांवर ५० बुलडोझर लावून कारवाई करण्यात आली, पण आज ८ कामगार मृत्यूशी झुंजताना तिथं चार दिवसांपासून अवघे दोन मशीन काम करत आहेत. सरकारला लाज कशी वाटत नाही? किड्या-मुंग्याप्रमाणे मरणाऱ्या गरीब माणसांचे जीव सरकारने आधी वाचवावेत आणि या घटनेला जबाबदार असलेल्या ठेकेदारांवर कठोरातील कठोर कारवाई करावी, त्यानंतरच कथित विकासाच्या गप्पा माराव्यात.”
पुण्यातील पिंपरी-चिंचवडमधील मोशी (Pune Moshi Building Collapse) येथे झालेल्या भीषण इमारत दुर्घटनेला तब्बल 64 तास उलटले असून, बचावकार्य अद्यापही युद्धपातळीवर सुरू आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफ, अग्निशमन दल, पोलीस आणि महापालिकेची यंत्रणा सलग प्रयत्न करत आहे. अत्याधुनिक कटर मशिनरीच्या मदतीने इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा स्लॅब हटवण्यात आला असून, आता पहिल्या मजल्याचा स्लॅब पाडण्याचे काम सुरू आहे.
दुर्घटनेनंतर एकूण 23 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर आली होती. त्यापैकी 15 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले. मात्र, अजूनही आठ कामगार स्लॅबखाली अडकल्याची शक्यता असल्याने शोधमोहीम अधिक सावधगिरीने सुरू ठेवण्यात आली आहे.
Ambegaon Landslide: आंबेगावातील दरडग्रस्त ५ गावांचे पुनर्वसन करणार; दिलीप वळसे पाटलांची मोठी ग्वाही
दरम्यान, इमारतीचा उर्वरित ढाचा अत्यंत धोकादायक अवस्थेत असून तो कधीही कोसळू शकतो, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे बचाव पथकाला प्रत्येक टप्प्यावर काळजीपूर्वक काम करावे लागत आहे. मोठ्या काँक्रीट स्लॅबमुळे जेसीबी किंवा जड यंत्रांचा वापर मर्यादित ठेवण्यात आला असून, अत्याधुनिक कटरच्या साहाय्याने स्लॅबचे तुकडे करून हटवले जात आहेत.






