पुण्यात पावसाचा जोर कमी होणार (फोटो- ai gemini)
द्रोणीय रेषेच्या प्रभावामुळे राज्यातील पावसाचा जोर कायम
चोवीस तासांत राज्यात जोरदार पावसाची नोंद
पुणे शहरातील पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता
सुनयना सोनवणे/पुणे: दक्षिण गुजरातपासून मध्य केरळपर्यंत किनारपट्टीलगत सक्रिय झालेल्या ऑफ शोअर ट्रफ म्हणजेच द्रोणीय रेषेच्या प्रभावामुळे राज्यातील पावसाचा जोर कायम आहे. गेल्या चोवीस तासांत कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत जोरदार ते अतिजोरदार पावसाची नोंद झाली. पुणे शहर आणि परिसरात बुधवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. शहरात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला, तर घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाच्या सरी कोसळल्या.
पुणे शहरात बुधवारी ( ता.८) कमाल तापमान २५ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२.९ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. मंगळवारी रात्रीच्या सुमारास पावसाचा जोर वाढला. त्याचवेळी खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे नदीकाठच्या परिसरात पाणी आल्याने काही भागांतील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, गुरुवारी (दि. ९) पुणे शहरातील पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे. शहरात कमाल तापमान २६ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. आकाश पूर्णतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मात्र घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असल्याने घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुणेकरांवर भीषण संकट! Khadakwasla धरणातून मुठा नदीत तब्बल ‘इतक्या’ हजार…; पावसाचा जोर कायम
दरम्यान, शुक्रवारपासून पावसाचा जोर हळूहळू कमी होण्याची शक्यता असून तापमानात किंचित वाढ होण्याचा अंदाज आहे. शुक्रवारी पुणे शहरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे घाट परिसरासाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील पावसाची नोंद (मिमी मध्ये)
– लवळे : ५९ मिमी
– गिरिवन : ३९ मिमी
– भोर : २६ मिमी
– माळीण : १६.५ मिमी
– पाषाण : १६.२ मिमी
– शिवाजीनगर : १५.१ मिमी
– निमगिरी : ११.५ मिमी
– चिंचवड : ९.५ मिमी
– दापोडी : ६.५ मिमी
– राजगुरुनगर : ५ मिमी
– दौंड : ४ मिमी
– हडपसर : ३ मिमी
– शिरूर : ३ मिमी
– दुदुळगाव : २.५ मिमी
– बारामती : १.८ मिमी






