पुण्यात जीबीएसमुळे 5 रूग्णांचा मृत्यू (फोटो- istockphoto/टीम नवराष्ट्र)
पुणे: महाराष्ट्रात गुइलेन-बॅरे सिंड्रोमच्या एकूण रुग्णांची संख्या 163 झाली आहे. विभागाच्या अहवालात म्हटले आहे की, सर्वाधिक प्रकरणे पुण्यातून आली आहेत. तर फक्त आठ रुग्ण शेजारच्या जिल्ह्यांतील आहेत. पुणे जिल्ह्यात पाच जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. प्रामुख्याने हा आजार दुषित पाण्यामुळे होत असल्याचे मानले जात आहे. अशात शहरातील रहिवासी वापरत असलेल्या पाण्याची तपासणी सुरू आहे.
नवीन विलीन झालेल्या गावांच्या पाण्यात, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरच्या पाण्यात दूषितता आढळल्यानंतर आता, कॅन, जार आणि बाटल्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या रिव्हर्स ऑस्मोसिस प्लांटच्या पाण्यात दुषितता आणि जीवाणू आढळून आल्याची माहिती पुणे महापालिकेने दिली आहे. पीएमसीच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकुमार जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभावित क्षेत्रातील 30 पैकी 19 खाजगी आरओ वॉटर प्लांट दूषित पाण्याचे कॅन पुरवत आहेत.
ते पुढे म्हणाले, ‘आम्ही त्यांना नोटिसा पाठवल्या आहेत आणि पाणी निर्जंतुक करण्यासाठी आणि कोणत्याही प्रकारचे दूषितीकरण टाळण्यासाठी ब्लीचिंग पावडर पुरवली आहे. क्लोरिनेशनवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि आम्ही आता नांदेड आणि किरकटवाडी येथे क्लोरिनेशन प्लांट बसवण्याची योजना आखत आहोत. 30 खाजगी आरओ प्लांट किंवा वॉटर एटीएमपैकी 19 मध्ये कोलिफॉर्म बॅक्टेरिया असल्याचे आढळून आले आणि त्यापैकी 14 मध्ये ई. कोलाय देखील आहे. दूषित पाणी असल्याने ते पिण्यास असुरक्षित आहे.’ या खाजगी आरओ प्लांट्सद्वारे व्यक्ती आणि व्यवसायांना मोठ्या क्षमतेचे पाण्याचे कॅन विकले जातात. प्रामुख्याने कार्यालये, सार्वजनिक मेळाव्याची ठिकाणे आणि लग्नाचे हॉल या ठिकाणी हे पाणी पिण्यास वापरले जाते.
हेही वाचा: गुइलेन-बॅरे सिंड्रोममुळे आणखी एकाचा मृ्त्यू; आतापर्यंतच्या मृतांची संख्या पाचवर
३० नमुन्यांचे मूल्यांकन
पीएमसी प्रशासनाला गेल्या आठवड्यात जीबीएस-प्रभावित भागात दररोज 800 फेऱ्या करणाऱ्या 15 खाजगी पाण्याच्या टँकर सेवा प्रदात्यांकडून घेतलेल्या नमुन्यांमध्ये बॅक्टेरियाचे दूषित घटक आढळले. 28 जानेवारी रोजी, पीएमसीने धायरी, सिंहगड रोड, किरकटवाडी, खडकवासला आणि आसपासच्या नांदेड शहराच्या परिसरात आरओ प्लांट, वॉटर एटीएम, पिण्याच्या पाण्याचे जार आणि पाणी विकणाऱ्या विक्रेत्यांकडून गोळा केलेल्या 30 नमुन्यांचे मूल्यांकन केले. यामध्ये बॅक्टेरियाचे दूषित प्रमाण स्वीकार्य पातळीपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त आढळून आले.
गुइलेन-बॅरे सिंड्रोममुळे आणखी एकाचा मृ्त्यू
गुइलेन-बॅरे सिंड्रोममुळे झालेल्या आणखी एका मृत्यूमुळे मृतांची संख्या पाचवर पोहचली आहे. तर महाराष्ट्रानंतर आसाममध्ये गुइलेन-बॅरे सिंड्रोममुळे झालेल्या पहिल्या मृत्यूमुळे भीती वाढली आहे. महाराष्ट्रात गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) मुळे कालपर्यंत चार जणांच्या मृत्यूची नोंद झाली होती. त्यानंतर जीबीएसमुळे पुण्यात काल पाचवा मृत्यू झाला. जीबीएसमुळे काल पुण्यात एका 60 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. या मृत्यूनंतर आता राज्य सरकारही अलर्ट मोडवर आले आहे.
महाराष्ट्रातील नांदेड गावातील एका ६० वर्षीय वृद्धाचा शनिवारी पहाटे १२:३० वाजता पुण्यातील ससून रुग्णालयात मृत्यू झाला. १६ जानेवारीपासून ते रुग्णालयात दाखल होते. पुण्यात जीबीएसच्या प्रकरणांमध्ये सतत होणारी वाढ ही चिंतेची बाब आहे. गंभीर स्थितीत असलेल्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. शुक्रवारपर्यंत आयसीयूमध्ये ४५ रुग्ण दाखल होते, ज्यांची संख्या आता ८३ झाली आहे. व्हेंटिलेटरवरील रुग्णांची संख्या १८ वरून २८ झाली आहे. दुसरीकडे, ३८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.