आषाढी वारीसाठी प्रशासन सज्ज; सुरक्षेसाठी DySP दर्जाच्या नोडल अधिकाऱ्याची होणार नियुक्ती
पुणे : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहू, आळंदी आणि सासवड येथून प्रस्थान करणाऱ्या पालखी सोहळ्यांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. वारकऱ्यांना दर्जेदार सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली असून, पालखी मार्गावरील प्रलंबित कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. विशेष म्हणजे, यंदा पालखी सोहळ्याच्या सुरक्षिततेसाठी आणि समन्वयासाठी ‘डीवायएसपी’ दर्जाच्या अधिकाऱ्याची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत देहू येथील जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज आणि सासवड येथील संत सोपानदेव महाराज पालखी सोहळ्यांच्या मार्गावरील रस्ते, मुक्कामस्थळे आणि आरोग्याच्या सुविधांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
पायाभूत सुविधांवर भर
देहूतील इनामदार वाडा परिसरातील रस्ते रुंदीकरणासाठी तातडीने भूसंपादन करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. देहू कॅन्टोन्मेंट हद्दीतील खराब रस्त्यांची दुरुस्ती पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमार्फत केली जाईल. तसेच आकुर्डी येथील मेट्रोची कामे आणि रस्ते दुरुस्ती पालखी आगमनापूर्वी पूर्ण करण्याची ग्वाही संबंधित यंत्रणेने दिली आहे. लोणी काळभोर येथे वारकऱ्यांच्या सुविधेसाठी यंदा जर्मन हँगर, मुबलक पाणी आणि स्वच्छता व्यवस्था अधिक व्यापक प्रमाणात असेल.
आळंदीत ‘स्काय वॉक’च्या धर्तीवर पूल
आळंदी येथील नवीन भक्ती सोपान पुलाची उंची ‘स्काय वॉक’प्रमाणे वाढविण्याबाबत आणि दर्शन बारीसाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. आळंदी परिसरात सुरक्षिततेसाठी १८० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, दिवे घाट परिसरात बॅरेकेटिंग व प्रकाश व्यवस्था राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून केली जाणार आहे.
आरोग्य आणि पाणीपुरवठा
पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज संस्थानांना प्रत्येकी एक स्वतंत्र रुग्णवाहिका दिली जाणार आहे. तसेच नीरा नदीत पालखी आगमनाच्या दोन दिवस आधी पाणी सोडण्याच्या सूचना जलसंपदा विभागाला देण्यात आल्या आहेत. सासवड येथील पालखी मार्गावरील खड्डे भरण्याचे कामही प्रगतीपथावर आहे.
पालखी सोहळा हा जगातील अत्यंत शिस्तबद्ध सोहळा
“पालखी सोहळा हा जगातील अत्यंत शिस्तबद्ध सोहळा असून, यामध्ये वारकऱ्यांना रस्ते, पाणी आणि आरोग्य सुविधा पुरवण्यात कोणतीही कसर सोडू नका. सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे,” असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यावेळी केले.
Maharashtra Politics : वादाची ठिणगी, संघर्षाचा ज्वालामुखी; नांदेड – परभणी भाजपमध्ये उफाळला असंतोष






