भाजपा नांदेड व परभणी मध्ये अंतर्गत वाद व गटबाजी सुरू असल्याचे समोर आले आहे (फोटो - सोशल मीडिया)
Nanded Political News : नांदेड: मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक कामकाजात वाढत चाललेल्या अंतर्गत संघर्षांची प्रदेश नेतृत्वाने गंभीर दखल घेतल्याची माहिती समोर येत आहे. विशेषतः नांदेड आणि परभणी या दोन जिल्ह्यांतील गटबाजी आता उघडपणे समोर आल्याने पक्षश्रेष्ठी चिंतेत असल्याचे सांगितले जाते. (BJP Politics) नांदेडमध्ये संघटनात्मक पातळीवर दोन स्पष्ट गट निर्माण झाल्याची चर्चा असून, एका गटाच्या कार्यक्रमांना दुसरा गट सातत्याने अनुपस्थित राहत असल्याने पक्षातील विसंवाद अधिक ठळक झाला आहे.
पक्षवाढीपेक्षा अंतर्गत शक्तीप्रदर्शनालाच अधिक महत्त्व दिले जात असल्याची भावना कार्यकत्यांत व्यक्त होत आहे. संघटनात्मक बांधणीमध्ये काही राज्यस्तरीय नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे महापालिकेतील नगरसेवक विरुद्ध भाजपाचे स्थानिक पदाधिकारी असा उभा संघर्ष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत या प्रकरणाची चांगलीच झाडाझडती झाल्याचे समजते. प्रदेशाध्यक्षांच्या समोर एका नेत्याने नगरसेवकाला ‘मीच तुला उमेदवारी मिळवून दिली, त्यामुळे तू शांत रहा’ अशी भाषा वापरल्याने वातावरण चिघळल्याचे समजते. दरम्यान, परभणीत परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. तेथे महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे विरुद्ध ११ नगरसेवक असा थेट संघर्ष पेटला आहे.
हे देखील वाचा : “10 मिनिटांमध्ये आलोच…! महिलेच्या सोशल मीडिया कमेंटला अमित शाहांनी दिले उत्तर
नगरसेवकांच्या निलंबनाची केली मागणी
पक्षशिस्त भंग केल्याचा आरोप करत संबंधित नगरसेवकांविरोधात निलंबनाची मागणी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे लेखी तक्रारीद्वारे करण्यात आल्याचे समजते. स्थापना दिन, पत्रकार परिषद, प्रशिक्षण कार्यशाळा आणि विविध बैठका अशा महत्त्वाच्या कार्यक्रमांना काही नगरसेवक सातत्याने गैरहजर राहिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे संघटनात्मक शिस्त ढासळत असल्याचा आरोप केला जात आहे. महापालिकेतील स्वीकृत सदस्य निवडीवरूनही वाद टोकाला गेला. परभणीतील हा वाद केवळ व्यक्तीगत संघर्ष नसून संघटनात्मक शिथिलतेचे लक्षण मानले जात आहे.
जिल्हाध्यक्ष आणि नगरसेवक आमनेसामने आल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. गटबाजी अधिक तीव होऊन पक्षाच्या निर्णयप्रक्रियेवरील विश्वास डळमळीत होऊ शकतो. यामुळे महापालिकेत स्थायी समिती, स्वीकृत सदस्य, विकासनिधी वाटप आणि स्थानिक प्रश्नांवरील निर्णय रखडण्याची शक्यता वाढली आहे. नगरसेवकांचे लक्ष जनतेच्या कामांपेक्षा अंतर्गत राजकारणाकडे वळल्यास नागरिकांमध्ये नाराजी वाढण्याची भीती आहे.
हे देखील वाचा : नितीन गडकरी व त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी! नागपूर पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात
आगामी निवडणुकीत दुष्परिणामाची भीती
विरोधकांना सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल करण्याची संधीही मिळू शकते. वेळेत मध्यस्थी न झाल्यास आगामी निवडणुकांवर त्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबईतील बैठकीत या वादामागे काही नेत्यांचा अवाजवी हस्तक्षेप असल्याची चर्चा झाली असून, प्रदेश नेतृत्वाने दोन्ही जिल्ह्यांतील परिस्थितीवर स्वतंत्र अहवाल मागविल्याचे समजते. एकूणच, बाहेर विरोधकांशी लढण्यापूर्वी भाजपासमोर आता स्वतःच्या घरातील कलह आवरण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.






