संग्रहित फोटो
लांजा : रात्रीच्यावेळी घरात टीव्ही पाहत बसलेल्या माणसांवर घरात घूसून बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन जण जखमी झाले. बुधवारी (दि. ३) रात्री नऊच्या दरम्यान लांजा तालुक्यातील बेनी बुद्रुक कुसुमलेवाडी येथे घडली आहे. घरातील माणसांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या शेजारील जंगलात पसार झाला. बिबट्याने केलेले हल्ल्यातील जखमी संतोष गोविंद सुर्वे (वय ५०) व हर्षद राजेंद्र सुर्वे (वय १९, दोघेही राहणार बेनी बुद्रुक कुसुमलेवाडी) यांच्यावर लांजा ग्रामीण रुग्णालयात प्रथमोचार करण्यात आले. मात्र संतोष सुर्वे यांच्या डोक्याला व कानाला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागल्याने त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
बेनी बुद्रुक, कुसुमलेवाडी येथील संतोष गोविंद सुर्वे व त्यांची पत्नी असे दोघे घरात रहातात. बुधवारी (दि. ३) रात्री घरात सव्वानऊच्या सुमारास संतोष सुर्वे व त्यांची पत्नी टीव्ही पाहत बसले होते. टीव्ही पाहत असताना घराच्या मागील दरवाजाने बिबट्या अचानक घरात शिरला. बिबट्याला पाहताच सुर्वे यांच्या पत्नीने घाबरून जोरात आरडाओरडा केला. मात्र बिबट्याला घराबाहेर पडण्यास दरवाजा मिळत नसल्याने बिथरलेल्या बिबट्याने संतोष सुर्वे यांच्यावर जबर हल्ला केला. संतोष सुर्वे यांनी बिबट्याशी दोन हात करत स्वतःला बिबट्याच्या तावडीतून वाचवले. मात्र बिबट्या आणि त्यांच्यांत झालेल्या झटापटीत ते जखमी झाले.
बिबट्याने त्यांच्या डोक्याला, हाताला, कानाला बिबट्याने नखे लावून जखमी केले. भरवस्तीतील घरात शिरून बिट्याने केलेल्या हल्याने बेनी बुद्रुक गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने तत्काळ या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून केली आहे. बिबट्याच्या हल्ल्याची माहिती मिळताच लांजा पंचायत समितीचे सभापती मानसी आंबेकर, बेनी बुद्रुक गावचे सरपंच परेश खानविलकर यांनी लांजा ग्रामीण रुग्णालय येथे जखमींची भेट देऊन माहिती जाणून घेतली. जखमींना तात्काळ औषध उपचार करण्याच्या सूचना केल्या. वनविभागाने बेनी बुद्रुक कुसुमलेवाडी येथे जाऊन परिसराची पाहणी केली.
आरडाओरडा केल्याने जंगलात पलायन
सुर्वे यांच्यावर बिबट्याने केलेला हल्ला पाहून सुर्वे यांची पत्नी रूममध्ये जाऊन त्यांनी जोरजोरात आरडाओरड केला. आवाजाच्या दिशेने शेजारील घरातील हर्षद सुर्वे हा सुर्वे यांच्या घराकडे धावून येत असतानाच त्याच क्षणी बिबट्या समोरील दरवाजाने बाहेर पळून जात होता. यावेळी घरात धावून येणाऱ्या हर्षदवरही बिबट्याने हल्ला केला. मात्र तिघांनीही जोरजोरात आरडाओरडा केल्याने बिबट्याने शेजारील जंगलात पलायन केले.
डोक्यावर, चेहऱ्यावर, हातावर ओरखडले
बिबट्याच्या हल्ल्यात संतोष व हर्षद जखमी झाले असून, यामध्ये संतोष यांच्या डोक्यावर, चेहऱ्यावर, हातावर बिबट्याची जबर नखे लागून ते गंभीर जखमी झाले आहेत. तर हर्षद याच्या डोक्याला व हाताला बिबट्याची नखे लागून जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच कुसुमलेवाडीसह गावातील नागरिकांनी जखमी संतोष सुर्वे व हर्षद सुर्वे यांना तातडीने लांजा ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र संतोष सुर्वे यांना जबर दुखापत झाल्याने त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.






