accident
पुणे : अपघात प्रवण क्षेत्र बनलेल्या नवले ब्रिज तसेच स्वामीनारायण मंदिर परिसरात पुन्हा भीषण अपघात झाला असून, साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात एका महिलेसह दोघे जागीच ठार झाले. पोलीसांनी ट्रकचालकाला अटक केली आहे.
सदाशिव चनबा सैय्या रायचुरकर (वय ५०, बालेवाडी) व प्रियंका मोहन सुखदेवे (वय २९, रा. ताथवडे) असे मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी ट्रकचालक संतोष वसंत बागडी (वय ३९, जि. सातारा) याला अटक केली आहे. याबाबत सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदाशिव व प्रियंका दोघेही सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. त्यांची ओळख होती. दरम्यान, ते दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून मुंबई-बंगलोर महामार्गावरून साताऱ्याच्या दिशेने जात होते. त्यावेळी स्वामी नारायण मंदिर परिसरातील तक्षशिला सोसायटीसमोर आल्यानंतर त्यांना ट्रकने पाठिमागून जोराची धडक दिली. धडक भीषण असल्याने दोघेही काही अंतर उडून पडले. यात दोघांनाही गंभीर मार लागल्याने त्यांचा जागिच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना रुग्णालयात दाखल केले. परंतु, त्यापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
ट्रकचालक संतोष बागडी याला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पी. बी. कणसे हे करत आहेत.






