संग्रहित फोटो
पाटस/राजेंद्र झेंडे : दौंड तालुक्यातील पाटस परिसरात सध्या भेसळयुक्त दुधाच्या विक्रीत मोठी वाढ झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. खाजगी पिशव्यांमध्ये भरून विकल्या जाणाऱ्या दुधामध्येही भेसळ होत असल्याचे प्रकार उघड होत आहेत. यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू असल्याची चिंता व्यक्त होत आहे. राज्यात यापूर्वी अनेक मोठ्या दूध डेअऱ्यांकडून दुधात भेसळ केल्याच्या घटना समोर आल्या असून, काही ठिकाणी कारवाईही करण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरही काही दूध संस्था व खाजगी डेअरी चालक छुप्या पद्धतीने दुधामध्ये भेसळ करत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, स्थानिक पातळीवरील छोट्या दूध विक्री केंद्रांमध्येही असा प्रकार सुरू असल्याची चर्चा पाटस परिसरात होत आहे.
पाटस येथील एका दूध विक्री दुकानातून काही ग्राहकांनी पांढऱ्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरलेले दूध खरेदी करून घरी नेले. ते दूध तापवल्यानंतर त्यावर रबरासारखा लांब लचक पांढरा चिकट पदार्थ तयार झाल्याचे आढळून आले. सुरुवातीला काहींनी दूध खराब झाले असावे असे समजून दुर्लक्ष केले. मात्र एका ग्राहकाने दूध तापवताना वर तयार झालेला पदार्थ चमच्याने काढला असता तो रबरासारखा लांब ताणला जात असल्याचे दिसून आले. हा प्रकार पाहून ग्राहकांना मोठा धक्का बसला.
माहितीनुसार, काही लहान व्यावसायिक शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करून त्यामध्ये विविध प्रकारचे मिश्रण करून दुधाचे प्रमाण वाढवतात. काही वेळा नामांकित डेअरीच्या दुधाचे मिश्रण तसेच इतर रासायनिक पदार्थ टाकून भेसळयुक्त दूध तयार केले जाते. त्यानंतर हे दूध कोणत्या डेअरीचे आहे हे समजू नये म्हणून साध्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये पॅक करून विक्री केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पाटस परिसरात अनेक शेतकरी व तरुण शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय करत आहेत. परिसरात ‘स्वीट होम’सह सुमारे आठ ते दहा लहान-मोठे दूध विक्री व्यवसाय सुरू आहेत. मात्र काही व्यावसायिक अधिक नफा मिळवण्यासाठी दुधात भेसळ करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. यामुळे लहान मुले व नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होत आहे.
या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन तसेच आरोग्य विभागाने परिसरातील दूध विक्री केंद्रे, डेअरी व दुकानांमधील दुधाची नियमित तपासणी करावी आणि भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे. दरम्यान, अखिल भारतीय ग्राहक पंचायत संघटनेचे अध्यक्ष गणेश जगताप यांनी सांगितले की, “मागील काही वर्षांपासून भेसळयुक्त दूध व दुधापासून बनणाऱ्या पदार्थांविरोधात आम्ही सातत्याने आवाज उठवत आहोत. यासंदर्भात अन्न व औषध प्रशासन विभागाकडे अनेक वेळा लेखी तक्रारीही दिल्या आहेत. मात्र अद्याप ठोस कारवाई होत नसल्याची खंत आहे.”
हे सुद्धा वाचा : नगरसेवकाच्या वाहनचालकाचे फिल्मी स्टाईल अपहरण; तोंड दाबून गाडीत कोंबलं अन् नंतर…






