पुणे शहरात हवेचा दर्जा खालावला
सुनयना सोनवणे/नवराष्ट्र: शहरातील हवेची गुणवत्ता लक्षणीय रित्या घसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून ही गुणवत्ता ‘चांगली’ या प्रवर्गातून ‘मध्यम’ या प्रवर्गात आली आहे. आगामी हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही बाब चिंता वाढवणारी आहे. गेल्या पाच ते सहा दिवसात आकाश निरभ्र झाल्यामुळे प्रदूषणाच्या पातळीत हा बदल स्पष्टपणे जाणवत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) दिलेल्या माहितीनुसार हवामानातील बदल आणि प्रदूषण नियंत्रण घटकातील अनियमिततेमुळे प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हवा प्रदूषण हा चिंतेचा विषय ठरत आहे. सध्या एमपीसीबी चे सहा ठिकाणी केंद्र आहेत. भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (आयआयटीएम) पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील दहा ठिकाणी हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण करते.
याविषयी ‘परिसर’ संस्थेच्या वरिष्ठ प्रकल्प सहाय्यक श्वेता वेर्णेकर म्हणाल्या, हिवाळ्यात तापमानात घट होते आणि थंड, दाट हवेचा थर तयार होतो. या थरामुळे प्रदूषणकारी घटक हवेत अडकून राहतात. त्यामुळे उन्हाळा किंवा पावसाळ्याच्या तुलनेत हवेतील प्रदूषणाचे प्रमाण अधिक वाढते. रात्री वाहनांची संख्या कमी असली तरी अनेक ठिकाणी अनधिकृतपणे कचरा जाळला जातो. त्यामुळे रात्रीच्या वेळीही हवेतील प्रदूषणाचे प्रमाण अधिक दिसते. या गोष्टी लक्षात घेऊन महापालिकेने योग्य उपाययोजना करणं आवश्यक आहे.
पुढे त्या म्हणाल्या, अलीकडे पावसाचे दिवस जास्त असल्यामुळे हवेतील प्रदूषण कमी होतं, कारण पावसामुळे धूळ आणि कण जमिनीवर बसतात. त्यामुळे त्या काळात हवेची गुणवत्ता ‘चांगली’ या श्रेणीत होती. मात्र आता पावसाने विश्रांती घेतल्याने पुन्हा प्रदूषण वाढले असून हवा ‘चांगल्या’ श्रेणीतून ‘मध्यम’ श्रेणीत गेली आहे. आगामी काळात दिवाळीच्या फटाक्यांमुळे हवेतील प्रदूषण आणखी वाढून गुणवत्ता ‘निकृष्ट’ श्रेणीत जाण्याची शक्यत आहे.’
शहरातील ६ केंद्रांवर हवेचा गुणवत्ता निर्देशांक ‘मध्यम’ प्रवर्गात
शहरात गेल्या काही दिवसांपासून हवामान स्वच्छ झाल्याने हवेतील आर्द्रता कमी झाली, मात्र त्यामुळे प्रदूषणाचे कण हवेत अधिक काळ राहत आहेत. परिणामी, शहराचा एकूण ‘हवेचा गुणवत्ता निर्देशांक’ मंगळवारी (ता. १४) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास ११७ इतका नोंदवला गेला, जो ‘मध्यम’ (१०१-२००) या प्रवर्गात येतो.
‘एअर क्वालिटी अर्ली वॉर्निंग अँड डिसिजन सपोर्ट सिस्टीम’ (एईक्युएमएस) या सी-डॅक आणि ‘आयआयटीएम’च्या संयुक्त उपक्रमाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, पुण्यातील किमान सहा निरीक्षण केंद्रांवर हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा १००च्या पुढे नोंदविण्यात आला आहे.
लोहगाव (१४४), भुमकर चौक (१२५), वाकड (१४५), थेरगाव (११६), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (१४०), गवळीनगर (११३) यांचा समावेश आहे. तर शिवाजीनगर (९०), कात्रज डेअरी (९३), पाषाण (९०), निगडी (८८),आणि कात्रज (५५), हे चांगल्या श्रेणीत आहेत.
‘पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत चिखली आणि कासारवाडी परिसरात दोन नवीन स्वयंचलित हवा गुणवत्ता निरीक्षण केंद्र स्थापित केले जाणार आहेत. जेणेकरून वायु प्रदूषकांचा प्रत्यक्ष वेळेत अभ्यास आणि विश्लेषण करता येईल.’ मंचक जाधव, उपप्रादेशिक अधिकारी, एमपीसीबी