सौजन्य - नवराष्ट्र टीम
प्रभाग २५ मध्ये मोठ्या प्रमाणावर जुने वाडे व सोसायट्या असून, त्यांच्या पुनर्विकासासंबंधी अनेक अडचणी आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना या कामांसाठी वारंवार चकरा माराव्या लागतात. पुनर्विकासासाठी लागणारा कायदेशीर सल्ला, आवश्यक कागदपत्रे तसेच त्यासंबंधी मार्गदर्शन देण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याचे बाप्पु मानकर यांनी सांगितले. या कक्षाच्या माध्यमातून पुनर्विकासासाठी लागणारा कायदेशीर सल्ला, आवश्यक कागदपत्रांची माहिती, कायदेशीर मदत तसेच सोसायट्यांच्या मानीव अभिहस्तांतरण (डिम्ड कन्व्हेन्स) प्रक्रियेसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा अनेक ज्येष्ठ नागरिकांसह सर्वसामान्य नागरिकांना मोठा लाभ होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रभाग २५ मधून राघवेंद्र बाप्पु मानकर, स्वरदा बापट, कुणाल टिळक आणि स्वप्नाली पंडित हे निवडणूक लढवत आहेत. रविवारी हेमंत रासने यांच्या प्रमुख उपस्थितीत महात्मा फुले मंडईतील व्यापाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. तसेच, रविवारचा सुट्टीचा दिवस असल्याने शनिवार पेठ, नारायण पेठ व बुधवार पेठ परिसरात पदयात्राही काढण्यात आली.
फिरते समस्या निवारण कार्यालय सुरू करणार
आजवर २४ तास जनसेवा कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांची कामे मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. पुढील काळात ज्येष्ठ नागरिकांच्या तातडीच्या सेवेसाठी ‘फिरते समस्या निवारण कार्यालय’ थेट त्यांच्या दारी जाऊन समस्या सोडवेल, अशी घोषणा भाजपचे उमेदवार राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी केली. प्रभाग २५ – शनिवार पेठ व महात्मा फुले मंडई परिसरात ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यांना कोणतीही तातडीची समस्या उद्भवल्यास घरपोच सेवा देण्यासाठी ‘फिरते समस्या निवारण कार्यालय’ सुरू करण्यात येणार आहे. हेल्पलाईन क्रमांकाद्वारे ड्रेनेज, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य आदी समस्यांची माहिती कार्यालयाला दिल्यास, संबंधित परिसरात तातडीने भेट देऊन समस्या सोडविण्याचे काम सुरू केले जाईल, असेही मानकर यांनी सांगितले.






