पुणे मेट्रो (फोटो- istockphoto)
पुणे: स्वारगेट ते कात्रज या भुयारी मेट्राे मार्गाचे आरेखन बदलण्यात आले आहे. हा मार्ग आता शंकर महाराज समाधी मठाच्या खालून जाणार नाही असे महामेट्राेने स्पष्ट केले आहे. पुणे शहरातील मेट्राे मार्गांचे विस्तारीकरण केले जाणार आहे. यामध्ये इतर मेट्राे मार्गाप्रमाणेच स्वारगेट ते कात्रज या मार्गाचा समावेश आहे. हा मार्ग भुयारी असुन, ताे सातारा रस्त्यावर धनकवडी येथील शंकर महाराज समाधी मठाच्या खालून जात आहे. अशी माहीती पुढे आली हाेती. सदर मार्ग हा समाधी मठाच्या खालून जात असल्याने मठाचे विश्वस्त, प्रशासन यांनी महामेट्राेला सदर मार्ग समाधी मठाच्या खालून नेण्यात येऊ नये अशी मागणी केली हाेती. या मागणीची महामेट्राेने दखल घेतली आहे.
महामेट्राेने श्री सदगुरु संतवर्य याेगीराज शंकरमहाराज समाधी ट्रस्टला पत्र पाठविले आहे. सदर मार्गचे आरेखन बदलण्यात आले आहे. समाधीच्या बाहेरून मार्गस्थ करण्यासाठी मार्गिकेचे आरेखन सुधारीत केले जात आहे. महामेट्राेने शहरातील मध्यभागातून भुयारी मार्ग आणि स्टेशन उभारले आहे. हे उभारताना परीसरातील काेणत्याही इमारतीला हानी पाेहचणार नाही याची काळजी घेतली आहे. त्याचप्रमाणे शंकर महाराज समाधी स्थळास काेणतीही हानी पाेहचणार नाही यासाठी महामेट्राे कटिबद्ध असल्याचे पत्रात नमूद केले आहे. त्याच प्रमाणे पद्मावती येथील मेट्राे स्थानकास नाव देण्यासंदर्भात याेग्य ती कार्यवाही केली जाईल असेही पत्रात म्हटले आहे.
स्वारगेट-कात्रज मार्गावर चार मेट्रो स्थानकं होणार
स्वारगेट-कात्रज भूमिगत मेट्रो मार्गावर बालाजीनगर येथे नवीन मेट्रो स्थानक उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेने स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवला आहे. त्यामुळे स्वारगेट ते कात्रज या प्रस्तावित भुयारी मेट्रो मार्गावर तीन ऐवजी आता चार मेट्रो स्थानके असणार आहेत. . या स्थानकाचा खर्च महामेट्रो करणार असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले. पुण्यात आता मेट्रो सुरू झाली असून अनेक ठिकाणी स्टेशनचे बांधकाम सुरू आहे तर काही स्टेशनचे बांधकाम पूर्ण झालेले आहे.
स्वारगेट ते कात्रज या सुमारे ५.४०० किलो मीटर लांबीच्या मेट्रो मार्गाच्या सविस्तर प्रकल्प अहवालामध्ये मार्केटयार्ड, पद्मावती, कात्रज अशी तीन स्थानके प्रस्तावित करण्यात आली आहेत. या मार्गासाठी सुमारे २ हजार ९५४ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पात पुणे महापालिकेचा आर्थिक सहभाग १५ टक्के (४८५ कोटी) असेल. या प्रकल्पासाठी लागणारी जागा महापालिका देणार असून तिची किंमत (२४८ कोटी) असेल.
मेट्रोच्या दोन स्थानकामधील अंतर हे एक ते दीड किलो मीटर पेक्षा अधिक नसावे, असा नियम आहे. मात्र या विस्तारित मेट्रो मार्गाच्या पद्मावती ते कात्रज या स्थानकातील अंतर १.९०० मीटर इतके आहे. त्यामुळे धनकवडी, बालाजीनगर येथील नागरिकांना मेट्रोचा फायदा होणार नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे बालाजीनगर येथे मेट्रो स्थानक व्हावे, अशी मागणी राजकीय मंडळी व नागरिकांकडून केली जात होती. या भागातून स्वारगेटकडे ये-जा करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असून बालाजीनगर येथील मेट्रो स्थानकाचा मोठा फायदा या भागातील नागरिकांना होईल. तसेच मेट्रोला देखील प्रवाशी उपलब्ध होऊन उत्पन्न वाढेल. त्यामुळे वेगवेगळ्या माध्यमातून पाठपुरावा केला होता. त्यानंतर प्रशासनाने बालाजीनगर येथे नवीन मेट्रो स्थानक उभारण्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवला आहे.