पुणे रिंग रोड (फोटो- सोशल मीडिया/टीम नवराष्ट्र)
पुणे : पुणे शहर आणि परिसरातील वाहतुकीच्या वाढत्या समस्येवर उपाय म्हणून पुणे रिंगरोड प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जिल्ह्यात पूर्व आणि पश्चिम रिंगरोड असून पश्चिम रिंगरोडचे 97 टक्के भूसंपादन झाले आहे. तर पूर्व रिंगरोडचे 90 टक्क्यांपेक्षा अधिक भूसंपादन झाले आहे. आता उर्वरित भूसंपादन पूर्ण करा, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. प्रत्यक्ष काम करण्यासाठी 90 टक्के भूसंपादन होणे आवश्यक असून, ते पूर्ण झाले. त्यामुळे आता कामाच्या भुमिपुजन कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वकांक्षी प्रकल्पापैकी पुणे रिंगरोड हा एक प्रकल्प आहे. त्याचे सध्या भूसंपादन सुरु असून, ते अंतिम टप्प्यात आहे. तर दुसरीकडे सर्व टप्प्यांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचे या प्रकल्पावर विशेष लक्ष असून, ते पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी उर्वरित भूसंपादन लवकर पूर्ण करा, अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी भूसंपादन अधिकाऱ्यांनी 28 फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण भूसंपादन करा, अशा सूचना दिल्या आहेत.
या प्रकल्पामुळे वाहतुकीचा ताण कमी होणार आहे आणि वेळेची व इंधनाची बचत होणार आहे. 65 कि.मी लांबीचा रिंगरोडचे काम लवकर होण्यासाठीच पाच टप्पे केले असून, एकाच वेळी ही कामे सुरू करण्याचा मानस एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांचा आहे. पश्चिम रिंग रोड हा भोर, हवेली, मुळशी आणि मावळ तालुक्यांतून, तर पूर्व रिंगरोड हा मावळ, खेड, हवेली, पुरंदर आणि भोर तालुक्यांतून जाणार आहे. कोणत्याही प्रकारच्या विलंबास संबंधित विभागांना जबाबदार धरले जाईल आणि आवश्यक ती तातडीची पावले उचलली जातील. यासोबतच प्रत्येक प्रकल्पासाठी जबाबदारी निश्चित केली जाईल. त्यामुळे प्रकल्प वेळेत पूर्ण होतील. संबंधित विभागांनी ठराविक कालमर्यादेत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान आणि संसाधनांचा योग्य वापर केले जाणार आहे.
रिंगरोड 110 मीटर रुंद असणार
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रिंग रोड हा प्रकल्प एमएसआरडीसीकडून हाती घेण्यात आला आहे. पूर्व रिंगरोड आणि पश्चिम रिंगरोड असे दोन भाग करण्यात आले आहेत. पूर्व रिंगरोड सुमारे 72 कि.मी, तर पश्चिम रिंगरोड सुमारे 66 कि.मी लांबीचा आणि रुंदी सुमारे 110 मीटर असणार आहे.
खडकवासला धरणाच्या बॅकवॉटरवरून असणार मोठा पूल
रिंगरोडसाठी भूसंपादन अंतिम टप्प्यात असताना दुसऱ्या बाजूला टेंडर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. काम वेळेत पूर्ण होण्यासाठी पश्चिम रिंगरोडचे पाच पॅकेज, तर पूर्व रिंगरोडचे चार पॅकेज केले आहेत. त्यामुळे मुदतीत काम पूर्ण करण्याचा शासनाचा निर्धार आहे. पश्चिम रिंगरोडला आठ बोगदे, तीन छोटे पूल, दोन मोठे पूल आणि खडकवासला धरणाच्या बॅकवॉटरवरून अर्धा किलोमीटर लांबीचा मोठा पूल अशी कामे होणार आहेत.
आतापर्यंत झालेले भूसंपादन (टक्केवारी)
पश्चिम भाग – 97
पूर्व भाग – 90
पुणे रिंगरोडसाठी 1950 हेक्टर क्षेत्र संपादीत केले जाणार आहे. त्यातील 1846 हेक्टर क्षेत्र संपादित झाले आहे. पूर्व भागासाठी 1176 हेक्टर क्षेत्र आवश्यक आहे. त्यातील आवश्यक 1088 हेक्टर क्षेत्र संपादीत झाला असून, 88 हेक्टर बाकी आहे. तर पश्चिम क्षेत्रासाठी 776 हेक्टर क्षेत्र आवश्यक आहे. त्यापैकी 758 हेक्टर क्षेत्र भूसंपादन झाले आहे. त्यातील 18 हेक्टर शिल्लक आहे. उर्वरित भूसंपादनासाठी एमएसआरडीसीकडे 500 कोटी रुपयांची मागणी केली आहे.
– कल्याण पाढरे, उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन समन्वय अधिकारी, पुणे