सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : युवकांसारख्या समाजातील महत्त्वाच्या घटकाला झुरळ म्हणणे युवाशक्तीचा अपमान आहे. वाढत्या बेरोजगारीसह त्यांच्या अन्य समस्यांवर मीठ चोळले जात आहे. ‘कॉक्रोच जनता पार्टी’ ला मिळणारा मोठा प्रतिसाद पाहून ते देशाबाहेरचे आहेत, असा गैरसमज पसरवत त्यांच्यावर बंदी आणली गेली,’ असा आरोप माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी केला आहे. कॉक्रोच जनता पार्टी ही तूर्त समाज माध्यमांवरून चालणारी चळवळ आहे,’ असेही कदम म्हणाले.
पुणे शहर आणि जिल्ह्यासह राज्यात गुन्हेगारी घटना वाढत आहे. महिलांवरील अत्याचार थांबत नाहीत. लहान मुलींवर अत्याचार होत आहेत. याला गृहमंत्री असलेले मुख्यमंत्रीच जबाबदार आहेत. राज्यात कायदा सुव्यवस्था राखणे ही त्यांची जबाबदारी आहे. किती गुन्हे जलदगती न्यायालयात चालवले गेले, किती गुन्ह्यांबाबत जलदगती न्यायालयाची फक्त घोषणाच झाली, त्यातील किती घटनांमध्ये अद्याप न्याय मिळालेला नाही, हे सर्वांसमोर आहे. त्यामुळे राज्य सरकार झोपले आहे की जागे आहे, हेच समजत नाही, अशी टीकाही डॉ. कदम यांनी पत्रकार परिषदेत केली .
राज्यात विविध समस्यांचे डोंगर उभे आहेत. महागाई, रस्त्यांची दुरावस्था, पाणीटंचाई, बेरोजगारी, कंत्राटदारांची थकलेली देणी, शेतकऱ्यांच्या समस्या याकडे दुर्लक्ष करत राज्य सरकार केवळ राजकारणच करत आहे, असेही कदम म्हणाले. ‘आखाती देशांमधील युद्धस्थितीमुळे पेट्रोल डिझेलवर परिणाम होणार आहे, याची सरकारला कल्पना होती. मात्र, त्याकडे लक्ष न देता भाजपचे केंद्र सरकार केवळ पाच राज्यातील निवडणुकांमध्येच मग्न होते. मधील काळात कोणत्याही उपाययोजना न करताच या सरकारने निवडणुकांचे मतदान झाल्याच्या ४८ तासातच इंधनाचे दर वाढवले. त्यामुळे आधीच महागाईने होरपळलेल्या जनतेच्या अडचणीत भरच पडली आहे, असेही कदम म्हणाले.
युवकांचा काँग्रेसलाच पाठिंबा आहे. काँग्रेस ही समाज माध्यमांवरून नव्हे तर रस्त्यावर उतरून काम करणारी संंघटना आहे. काँग्रेसने कायमच संपूर्ण समाजाच्या विविध प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढा दिला आहे. सभागृहात जनतेचे प्रश्न मांडले आहेत. त्यामुळे युवकही काँग्रेससोबतच आहेत. सध्या जिथे काँग्रेसची स्वत:ची सत्ता आहे, तिथे तसेच जिथे काँग्रेस मित्रपक्षांसह सत्तेत आहे, तिथे काँग्रेसने ४५ वर्षांच्या आतील युवा पदाधिकाऱ्यांनाच कॅबिनेट मंत्रीपद दिले आहे. कॉक्रोच जनता पार्टी ही तूर्त समाजमाध्यमांवरून चालणारी चळवळ आहे,’ असेही कदम म्हणाले.
नीट पेपरफुटी ही केंद्राचीच जबाबदारी
‘नीट’या वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या पेपरफुटीला केंद्र सरकारच जबाबदार आहे. ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’च्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. नीटचे पेपर फुटल्याने लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. यासाठी जबाबदार व्यक्तींवर कडक कारवाई झाली पाहिजे. तसेच यापुढे कोणताही पेपर फुटणार नाही, याची काळजी सरकारने घेतली पाहिजे, असे डॉ. विश्वजित कदम म्हणाले.






